14 मार्च 2020 रोजी कोळश्याच्या जहाजावर, ठार झालेल्या झारखंडच्या मजूरांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले?

दि. 14: (संजीव जोशी)
मार्चच्या सुरुवातीला देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली होती. चर्चा चालू झाली होती. दोनच दिवसांपूर्वी, 12 मार्च रोजी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. आणि त्यामुळे डहाणू उप जिल्हा रुग्णालयामध्ये आयोजीत करण्यात आलेले आरोग्य शिबीर रद्द करण्यात आले होते. 14 मार्च उजाडला तोपर्यंत पालघर जिल्ह्यातून 45 परदेश प्रवास केलेल्या 45 जणांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते व 5 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठण्यात आले होते.

परदेशांतून आलेल्या व्यक्तींबाबत प्रशासन विशेष लक्ष देण्याच्या मनस्थितीत होते. त्याच सुमारास डहाणूच्या समुद्रात एक महाकाय जहाज डहाणू औष्णिक वीज प्रकल्पाला परदेशातून आयात केलेला कोळसा पुरविण्यासाठी उभे होते. त्यातील परदेशी खलाशांपासून भारतीय नागरिकांना कुठलाही संसर्ग होऊ नये, यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मा. जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्या टेबलवर चर्चा झडल्या होत्या. आणि त्याच सुमारास 14 मार्च रोजी, डहाणूचे पोलिस निरीक्षक गोविंदाला लोणी खाण्याची संधी चालून आली. त्यांची पाचही बोटे लोण्यात गेली होती. जिल्ह्यात फक्त गुटखा, रेती आणि जुगारांच्या अड्ड्यांवरील चमकूगिरीचे छापे यांवर लक्ष ठेवणारे, नुसता गोंगाट करणारे, सध्या सक्तीच्या रजेवर गेलेले गौरव सिंग यांचे नेतृत्व होते (या संदर्भात शेवटच्या पॅरैग्राफमध्ये वाचा). त्यांच्या कार्यकाळात काहीही घडू शकत होते. 14 मार्च रोजी शनिवार होता. उप विभागीय कार्यालयाला दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. आणि रात्री 11 वाजताच्या सुमारास डहाणू औष्णिक वीज प्रकल्पामधून फोन खणाणला.

डहाणू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी

डहाणूतील समुद्रात, जहाजातून बार्जद्बारे वीज केंद्रात कोळसा आणण्यासाठी, बार्जमध्ये क्रेनच्या साहाय्याने कोळसा भरला जात असताना, क्रेनचा पंजा तुटून पडला आणि त्या खाली केशू भुखलाल महातो हा मुळचा झारखंड येथील, 55 वर्षीय मजूर डोक्याची कवटी फूटून जागीच ठार झाला. परमेश्वर कून्हा महतो हा मजूर जखमी झाला. यासंदर्भात डहाणू पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली असून त्याचा दाखल क्रमांक 18/2020 असा आहे. एरवी अपघाती मृत्यूचा तपास हवालदाराकडे दिला जातो. या प्रकरणी तपास स्वतः पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी स्वतःकडे ठेवला. कारण मरणारा झारखंडमधील होता. त्याला महाराष्ट्रात किंवा डहाणूत कोणी वाली नव्हता. त्याच्या टाळूवरील लोणी खूपच जास्त होते आणि ते खाणे सोपे होते.

सैनिक पत्नीला मारहाण, माजी मुख्याद्यापिकेला मारहाण, रोटरी क्लबच्या महिला पदाधिकारीकडून पैसे उकळले …. या पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेवर वरिष्ठ लक्ष देतात की नाही? कि हिस्सेदारी करतात?

या प्रकरणी सखोल तपास केल्यास, जहाजावरुन क्रेन निखळून पडलीच कशी, सुरक्षिततेचे काय उपाय योजले होते, हा अपघात आहे की घातपात आहे, यामध्ये हलगर्जीपणा आहे किंवा नाही, असेल तर कोणाचा? असे अनेक मुद्दे समोर येत होते. सदोष मनुष्यवधापर्यंत धमक्या देणे शक्य होते. डहाणू औष्णिक वीज केंद्राच्या कोळसा आणि राखेच्या व्यवहारांवर चर्चा होणार होत्या. प्रतिष्ठेवर ओरखडे पडणार होते. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सर्व होते किंवा नाही, याबाबत चर्चा होणार होत्या. जहाजावर कारवाई केली तर, जुगारांच्या फुटकळ केसमध्ये वाहने जप्त करुन जे लोणी मिळते त्याहून कित्येक पटीने संधी होती. जहाज 1 दिवस रोखून धरले तरी, त्यांना लाखो रुपयांचा भुरदंड सोसावा लागणार होता. हे सर्व टाळण्यासाठी ओमासेला 20 बोटे असली तरी 25 बोटे लोण्यांमध्ये बुडवून चाटायची संधी होती. ती संधी ओमासेने साधली.

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

जखमी परमेश्वर कून्हा महतोच्या नावाने खबर नोंदविण्यात आली. आणि त्याच्या नावे हवा तो बनाव करण्यात आला. या घटनेबद्दल ओमासेचे म्हणणे (तशी फिर्याद आहे आणि त्या फिर्यादीवर ओमासे विसंबून आहे) आहे, समुद्रातून एम व्ही रेहान नाव असलेल्या, बार्ज क्र. BDR IV 01517 मध्ये कोळसा भरुन वीज प्रकल्पामध्ये वाहून नेला असता बार्जचे इंजिन बिघडले म्हणून बार्ज नांगरून ठेवण्यात आला. तो केशू भुखलाल महातोने दुरुस्त करुन स्वतःच्या हाताने, बार्जचा नांगर काढत असताना, त्याचे हॅन्डल तूटून स्वतःच्याच डोक्याची कवटी फूटून ठार झाला. आणि दुसऱ्या सहकाऱ्याच्या दुखापतीला कारणीभूत ठरला. अशा तुटणाऱ्या हॅन्डलबाबत श्रीकृष्ण कंपनीचा सुपरवायझर महेंद्र (पूर्ण नाव ओमासेंना ही माहिती देताना माहिती नव्हते) याची चौकशी केली जाणार होती. मयत केशू भुखलाल महातोचे प्रेत, जखमी परमेश्वर कून्हा महतो याच्या ताब्यात देऊन पार्सल झारखंडला पाठविण्यात आले. कोणालाही काहीही न कळता विषय संपला. मृत व जखमीना काही नुकसान भरपाई दिली किंवा नाही इथपासून ते प्रेत नेण्यासाठीच्या खर्चाचे पैसे कोणी दिले, अशा कुठल्याही प्रश्नांची उत्तरे कोणी मागणार नव्हते. झारखंडमधून कोणीही काहीही विचारायला येणार नव्हते. मात्र कोणीही न विचारता ओमासेला समजले पाहिजे की, मयत आणि जखमी हे दोघेही फक्त मजूर होते. ते बार्जचे तांत्रीक काम करणारे नव्हते. त्यांचा संबंध फक्त कोळसा हाताळणीशी होता. ते इंजीन दुरुस्त करणारे नव्हते की नांगर टाकणारे व काढणारे कोणी नव्हते.

माझ्या फाईलमधला एक कागद वाढला होता. मात्र गौरव सिंगांना अशा सर्व विषयात गती नव्हती. म्हणून त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर या फाईलवरील धूळ झटकली आहे. अर्थात गुटख्यामधे देखील गती होती असे म्हणता येत नाही. कारण डहाणूतील पोलिसांच्या रेकॉर्डवरील पंचवटी गुटखा माफिया डहाणू काटी रोडवर, डहाणू पोलिस स्टेशनपासून 50 मीटर अंतरावरील, दक्षिणेकडील बाजूने तीसऱ्या गल्लीमध्ये गुटख्याचा खूलेपणाने घाऊक बाजार मांडून आहे. पजवाणी चाळीत त्याची कितीतरी गोदामे आहेत. त्याचे गुटख्याचे ट्रक अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली सुरळीतपणे कसे पोहोचतात. एरवी सर्वसामान्यांची वाहने जप्त करणारे घोलवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनावणे यांच्या नजरेतून निसटून ते चिखला येथे कसे माल उतरवतात? पुर्वी चिखल्यातून केला जाणारा पुरवठा लॉकडाऊनच्या काळात, चोरीने गुटखा विकणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी खूलेपणाने डहाणू पोलिस स्टेशनच्या बगलेतून कसे विकले जातात, अशा प्रश्नांची उत्तरे आता नव्या पोलिस प्रमुखांकडून मिळणे अपेक्षित आहे.