काही तास दुकाने बंद ठेवण्याचा दुकानदारांचा निर्णय

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 19 : राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासन विविध उपाययोजना आणि निर्बंध घालत आहे. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी होणार्या ठिकाणांवर म्हणजे ग्रामीण भागातील आठवडेबाजार आणि बाजारपेठा बंद करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. या आदेशातुन अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असताना, मोखाड्यातील खोडाळा ग्रामपंचायत आणि अत्यावश्यक सेवा देणार्या दुकानदारांनी स्वयंस्फुर्तीने काही तास दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यात करोना बाधित एकही रूग्ण आढळलेला नाही. खबरदारी म्हणून जिल्ह्यात करोनाने कोणीही बाधीत होऊ नये अथवा याची लागण कोणाला होऊ नये यासाठी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता गर्दी करणारे कार्यक्रम, यात्रा, जत्रा, आठवडेबाजार आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याची संपूर्ण जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे.
या आदेशाची मोखाडा तालुक्यातही तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र, यापुढेही अधिक खबरदारी घेऊन खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील, ग्रामस्थ आणि अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार यांनी एकत्र चर्चा करून गावात दुपारी 1 ते 5 या काळात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गावालगतच्या 30 ते 40 खेड्यापाड्यातील नागरीकांचे हाल होऊ नये म्हणून एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने खुली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 1 ते 5 लॉक डाऊन करून 5 वाजेनंतर गावातील नागरीकांना बाजारहाटीसाठी अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने पुन्हा खुली केली जाणार आहेत. या निर्णयामुळे दुकानांमध्ये एकत्रित होणारी गर्दी टाळली जाणार आहे. परिणामी करोनाचा संसर्ग टाळता येणार आहे.