तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; वाड्यातील दगडखदाणी सुरूच!

0
3187

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : तालुक्यातील पश्चिम घाट क्षेत्रात येणार्‍या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील 11 दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश अलिकडेच वाडा तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र या आदेशाला दगडखदाण मालकांनी केराची टोपली दाखवली असून दगडखदाणी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या दगडखदाणींमधुन रॉयल्टी घेऊन उत्खनन सुरूच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाडा तालुक्यातील काही भाग हा पश्चिम घाट क्षेत्रात येत असल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार या क्षेत्रात गौणखनिज उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वाड्यातील 11 दगडखदाणी या कायद्यात मोडत असल्याने त्या बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी अलिकडेच दिले आहेत. असे असतानाही अनेक दगडखदाणी व क्रशर मशिन राजरोसपणे सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता दुसर्‍या दगडखदाणींची रॉयल्टी घेऊन या खदाणी चालवत असल्याचे दगडखदाणीतील एका ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे. त्याचा फायदा खदाण मालक घेत असून राजरोसपणे दगडखदाणी सुरू ठेवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर अवैधपणे खदाणी चालवणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही ग्रामस्थांकडून केली जात आहे.

याबाबत वाडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार फारूख अत्तार यांच्याशी संपर्क साधला असता डोंगस्ते येथे सुरू असलेली श्री जी स्टोन क्रशर दगडखदाण बंद केल्याचे पत्र संबंधित मालकाने लिहून दिले असुन आम्ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे अत्तार स्पष्ट केले. तसेच आदेशाचा भंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.