>> चिखले गावात 4 संशयित पाहिल्याची माहिती ठरली अफवा
प्रतिनिधी/मनोर, दि. 9 : काल, सोमवारी समुद्रामार्गे डहाणू तालुक्यातील चिखले गावात 4 संशयित शिरल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरत असतानाच मनोर नजीकच्या नागझरी येथे परवानाधारक स्फोटक पदार्थ विक्रेत्याने त्याच्या जुन्या घरात बेकायदेशीररित्या साठवलेले जिलेटीन आणि डेटोनेटरसारखी स्फोटक सामग्री पालघरच्या गुन्हे शाखेने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
नागझरी येथे घरात बेकायदेशीरपणे जिलेटीनचा साठा असल्याची माहिती पालघर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री नागझरी गावातील प्रवीण अधिकारी यांच्या जुन्या घरावर छापा मारला असता येथे 327 जिलेटीनच्या कांड्या, 46 डेटोनेटर आणि 24 फ्युज अशी मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री बेकायदेशीर आणि निष्काळजीपणे साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलीसांनी ही स्फोटक सामग्री जप्त करून अधिकारी याच्या विरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 286, भारतीय स्फोटकांचा कायदा सन 1884 चे कलम 9(ब) (1)(ब) सह स्फोटक पदार्थ विषयक कायदा सन 1908 चे कलम 5 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
नागझरी परिसरात मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. खाणीतून दगड काढण्यासाठी स्फोट करावे लागतात. स्फोटक पदार्थ परवाना धारक विक्रेते दगड खाण मालकाना उपलब्ध करून देतात. ज्या पध्दतीने स्फोटक पदार्थ सहज आणि कुणालाही उपलब्ध होतात त्यामुळे घातपाताची शक्यताही नाकारता येत नाही. निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ हाताळल्यास अपघात घडून मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून स्फोटक पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणले पाहिजेत, अशी मागणी पुढे येत आहे.
[divider]
दरम्यान, सोमवारी सायंकाळी समुद्रामार्गे डहाणू तालुक्यातील चिखले गावात 4 संशयित शिरल्याचे संदेश विविध समाज माध्यमांवर फिरत असल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने परिसरात सर्च ऑपरेशन केले. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली. मात्र तपासाअंती ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
[divider]
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!
