धक्कादायक; व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सने घेतला महिलेचा बळी; बोईसरमधील घटना

0
1980
  • बोईसर पोलिसांचा बेजबाबदारपणा आला समोर

राजतंत्र/प्रतिनिधी
बोईसर : हल्ली एखाद्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून देणारा सोशल मीडिया अनेक कारणांनी बदनाम देखील होत आहे. याचीच प्रचिती बोईसर येथे पुन्हा एकदा आली असुन केवळ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले म्हणून उद्भवलेल्या वादातून एका 48 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना येथील शिवाजीनगर भागात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलावतीदेवी इकबाल प्रसाद असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असुन त्यांच्या मुलीने आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवलेल्या एका मजकुरामुळे तिचा मैत्रिणीसोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत होऊन वाद झालेल्या मुलीच्या कुटूंबातील 7 ते 8 लोकांच्या जमावाने 10 फेबु्रवारी रोजी शिवाजीनगर नविन वस्ती येथे राहणार्‍या लीलावतीदेवी यांच्यासह त्यांच्या दोन मुलींना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत लीलावतीदेवी प्रसाद यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बोईसर येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बोईसर पोलिसांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड!
10 फेबु्रवारीला घडलेल्या या घटनेनंतर लीलावतीदेवी यांच्या कुटूंबियांनी याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बोईसर पोलीस गाठले होते. मात्र नेहमीप्रमाणे बोईसर पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी नकार देत आरोपींना मोकळीक दिल्याचा आरोप होत आहे. अखेर लीलावतीदेवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बोईसर पोलिसांचे डोळे उघडले व यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.