राजतंत्र : वार्ताहर
वाडा : वाडा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोहज किल्ल्याकडे पुरातन विभाग आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालले आहे. कोहज किल्ल्यावर अनेक पाण्याची कुंडे आहेत. या पाण्याच्या कुंडांमध्ये काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात दगडी टाकल्या होत्या त्याच बरोबर या कुंडांमध्ये पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या पाण्यात माती वाहत गेल्याने ही कुंडे भरली होती. याची दखल स्वराज्यकार्य या गडकिल्ल्यांवर काम करणाऱ्या संस्थेने घेतली. त्यांनतर कोहोज किल्ल्याच्या संवर्धनासाठी स्वराज्यकार्य संस्थेने टीम कोहोजच्या माध्यमातून श्रमदानासाठी तरुणांना आवाहन केले होते. याला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला.
आणि आजूबाजूच्या परिसरातील ५५ युवक आणि १० युवती या टीममध्ये सामील होऊन त्यांनी किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या कोरीव टाक्यांमध्ये गोळा झालेली माती आणि दगड काढत या दगडांमध्ये कोरीव असलेल्या टाक्या साफ केल्या. त्याच बरोबर किल्ल्यावर चढण्यासासाठी आलेल्या पुरातन पायऱ्या खचल्या होत्या त्यावर मोठ्या प्रमाणात माती गोळा झाली होती. या पायऱ्यांचे दगड इतरत्र परसरे होते. हे दगड पुन्हा चांगल्या प्रकारे रचत किल्ल्यावर चढण्यासाठी असलेली बिकट वाट चांगली करत पुरातन पायऱ्यांना मोकळा श्वास दिला.

या कोहोज गड श्रमदान मोहिमसाठी रात्रीच हे युवक आणि युवती कोहोज गडावर पोहचले होते त्यांनी सकाळी ७ वाजता उठत हा श्रमदानाला सुरवात केली. आणि संध्याकाळपर्यंत हे श्रमदान पूर्ण केले. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील केलेले किल्ले नक्कीच आजची तरुण पिढी वाचवेल असा विश्वास या वेळी या श्रमदानात सामील झालेल्या युवकांनी व्यक्त केला.
ध्यास एकच आमच्या थोरल्या – धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक किल्ला आणि त्या किल्ल्याचा प्रत्येक चिरा आम्हाला संवर्धित करायचा आहे.
-अवी पाटील