डहाणू शहर: मृत्यूंची संख्या 1 ने वाढून 7 – अन्य आकडेवारी मात्र दिलासादायक!

0
4261

डहाणू दि 7 ऑगस्ट: डहाणू शहरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी घटली आहे. मागील 4 दिवसांत 26 नव्या कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून त्या आधी दररोज सरासरी 15 पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडत होती. त्याचवेळी 4 दिवसांत 31 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही बातमी दिलासादायक असली तरी मृत्यूची संख्या मात्र 1 ने वाढून 7 झाली आहे. काल (6 ऑगस्ट) त्रिमूर्ती रोडवेजचे संचालक मिलिंद पारेख (55) यांचे वेदांता (ठाणे) येथील रुग्णालयात निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार चालू होते.

डहाणू शहरात प्रथमच कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार चालू असलेल्या रुग्णांपेक्षा वाढली आहे. 6 ऑगस्ट पर्यंत निष्पन्न झालेल्या 248 रुग्णांपैकी 134 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यामध्ये अतिज्येष्ठ नागरिक जयंतीलाल नागशेठ (89) यांचाही समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 114 रुग्णांपैकी 92 जण कोव्हिड उपचार केंद्रात उपचार घेत असून 22 जण घरीच राहून उपचार घेत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण केलेल्यांची संख्या 980 वर स्थिर आहे. घरीच उपचार घेण्याची व विलगीकरणाची अनुमती देण्याचे धोरण जाहीर झाल्यानंतर तपासणी करुन घेण्यासाठी लोकांकडून तुलनेने अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

डहाणू शहरात 4 ऑगस्ट पासून लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर सतत 3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने लॉक डाऊनला हातभार लागला आहे. डहाणू नगरपरिषद क्षेत्राबाहेरील बाजारात मात्र गर्दी झालेली पहायला मिळाली.