पालघर, दि. 7: पालघर टाइम्सचे पाक्षिकाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी मित्र पुरस्काराचे मानकरी अशोक नाना चुरी यांचे आज शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी, वृद्धापकाळाने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव संतोष आणि विवाहित कन्या असा परिवार आहे.
झोपडपट्टी रहिवासी, कामगार, भिकारी व गोरगरिबांचे ते कैवारी होते. त्यांनी आजपर्यंत हजारो लोकांचे सामूहिक विवाह संपन्न केले आहेत. अनेक विश्वस्त संस्थांचे ते मार्गदर्शक होते. सध्या करोना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेता, दिवंगत अशोक नाना चुरी यांच्या पार्थिवावर निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे.