पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज, 7 जुलै रोजी कोविड-19 (कोरोना) चे 104 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक रुग्ण पालघर तालुक्यातील असुन हा आकडा 66 एवढा आहे. तर बोईसरमधील रुग्णसंख्या वाढीचा दर कायम असुन आज पुन्हा येथे 34 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात (वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून) आज 104 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 4 हजार 16 वर पोहोचला असुन आजपर्यंत यातील 3020 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. तर 930 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 66 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- पालघरमध्ये सर्वाधिक 66 रुग्ण; तर जव्हार-मोखाड्यात एकही नवीन रुग्ण नाही!
पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) रोजच शंभराच्या आसपास रुग्ण वाढत असले तरी यातील सर्वाधिक रुग्ण पालघर व डहाणू या अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्यांमध्येच आढळून येत आहेत. आज पालघर तालुक्यातील 66, डहाणूतील 13, विक्रमगडमधील 10 व वाडा आणि वसई ग्रामीणमधील प्रत्येकी 5 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असुन जव्हार व मोखाड्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
बोईसरची रुग्णवाढीची गती कायम
पालघर ग्रामीणमधील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरत असलेल्या बोईसर शहरातील रुग्ण वाढीची गती कायम असुन आज या भागात 34 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बोईसरमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.