आता तलासरीत 8.37 लाखांचा गुटखा पकडला!

0
1792

तलासरी, दि. 11 : गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर चुप्या पद्धतीने गुटखा विक्रीसाठी आणला जात असुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांच्या वाहन तपासणीत लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी (डहाणू) हद्दीत 8.83 लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला असताना आता दापचरी (तलासरी) चेकपोस्टवर पोलिसांनी एका पिकअप टेम्पोतून 8 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

9 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली. दापचरी आरटीओ चेक पोस्टवर संशयित वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी एम.एच. 05/डी.के. 5879 क्रमांकाच्या महेंद्रा पिकअप टेम्पोचालकाला अडवले. टेम्पोची तपासणी केली असता त्यात 6 लाख 99 हजार 600 रुपये किंमतीचा विमल पान मसाला, 88 हजार रुपये किंमतीची व्ही-1 तंबाखु, 25 हजार 200 रुपये किंमतीचा आरएमडी पानमसाला, 24 हजार रुपये किंमतीची एम सेंटेड तंबाखु असा एकुण 8 लाख 36 हजार 800 रुपयांचा गुटखा आढळून आला. या टेम्पोत कुजलेल्या अवस्थेत असलेले सुमारे 150 किलो मक्याचे कणीसही आढळून आले आहेत.

पोलिसांनी टेम्पो व मुद्देमाल जप्त करत टेम्पोचालकासह अन्य एकाला अटक केली आहेत. दोघांवरही तलासरी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उप निरिक्षक यु. ए. रोठे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.