
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 31 : कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती हा जबाबदार नागरिक असली पाहिजे. त्याला भारताचे संविधान आणि लोकशाही समजली पाहिजे. कुठलेही कायदे हे आपणच आपल्यासाठी बनवत असतो. त्यामुळे ते समजूनही घेतले पाहिजेत आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे, असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात बोलताना मांडले. कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींसाठी भारताचे संविधान व विविध कायदे या विषयावर जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषी शास्त्रज्ञ उत्तम सहाणे व डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत उपस्थित होते.

कुठलाही व्यापार हा कायदे व नियम पालन करुन करणे किंचित खडतर ठरु शकत असले तरी त्याच मार्गावरून यशस्वी होता येते. शॉर्टकटचा वापर क्षणिक फायद्याचा वाटत असला तो शास्वत नसतो. संविधानिक मुल्यांचा वापर व्यापार्यांनी केल्यास कृषी क्षेत्रात दर्जेदार व प्रामाणिक सेवा पुरविल्यास राष्ट्र उभारणीच्या कामास हातभार लागेल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना आपापल्या भागात किटकनाशकाच्या दुकानासहीत विविध कृषी सेवा देणे शक्य होणार आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना कृषी क्षेत्रासह विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाते.