डहाणू : तृतीयपंथी व ग्रामस्थांमध्ये तणाव; पोलिस निरीक्षक ओमासेसमोर बाचाबाची

0
2344

मुंबईतून डहाणूत आलेल्या तृतीयपंथीयांना कोरोनाची लागण झाल्याच्या संशयाने ग्रामस्थ व तृतीयपंथी यांच्यातील तणाव वाढत असून पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेचे अपयश समोर आले आहे. आज काही लोकांनी, ओमासेसमोरच तृतीयपंथीयांना मुंबईतून आणणाऱ्या वाहनचालकावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृतीयपंथीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

16 एप्रिल रोजी 3 तृतीयपंथी मुंबईतून डहाणू येथे परतले होते. त्यांना डहाणू उप जिल्हा रुग्णालयाने होम क्वारन्टाईनचा सल्ला देण्यात आला होता. ते मुंबईतून परतल्यामुळे लोकांमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे व त्यांच्या अन्य 3 अंमलदारांनी शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याऐवजी तृतीयपंथीयांकडून 25 हजार रुपये उकळले. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानंतर लोकांनी तृतीयपंथीयांचा वाडा, त्यातील 36 रहिवाशांसह कंपाऊंड टाकून बंदिस्त केला. तहसिलदार कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर 30 एप्रिल रोजी वाडा मोकळा करण्यात आला.

मात्र 14 दिवस आपल्याला कोंडून ठेवले ह्या भावनेने तृतीयपंथी दुखावले गेले असून त्यांनी, सरकारने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कारवाईच्या भीतीने परिसरातील नागरिकांमध्ये देखील अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेचा बांध अखेर आज फुटला. आज रात्री 8.30 च्या सुमारास, पोलिस निरीक्षक ओमासे त्या परिसरात गेले असता, त्यांच्या समक्षच तृतीयपंथीयांना मुंबईतून डहाणूत आणणाऱ्या चालकावर हल्ला चढवला. तूर्त तरी प्रकरण तात्पुरते शमले असून आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे.

काल (14 मे) डहाणूत, महिलेवर हल्ला व लूटमार: येथील थर्मल पॉवर प्रकल्पामधे एका अभियंत्याच्या पत्नीवर प्रकल्प वसाहतीतील बगिच्यामध्ये हल्ला झाला होता. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वसाहतीमध्ये सकाळी 7.45 वाजता ही महिला मॉर्निंग वॉक करीत असताना, अज्ञात इसमाने तिच्यावर विटेच्या सहाय्याने हल्ला करीत हातातील सोन्याच्या 4 अंगठ्या व पर्समधील 580 रुपये रोख हिसकावले. डहाणूच्या कायदा व सुव्यवस्थेला ग्रहण लागल्याचे निष्पन्न होत आहे.