मा. गृहमंत्री महोदय, ” त्या ” तृतीयपंथीयांना आपल्या शुभहस्ते मदत द्यायची आहे.

मा. गृहमंत्री अनीलजी देशमुख,

(16 मे 2020) डहाणू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे याच्या विरोधातील लोकांच्या तक्रारी मांडणे मी तूर्तास थांबवित आहे. तृतीयपंथीयांकडून त्यांनी 25 हजारांची खंडणी घेतल्याचे प्रकरण देखील आपण थांबवू या! रोज किती तक्रारींना वाचा फोडणार? अशा भ्रष्ट्र अधिकाऱ्याच्या रोजच्या तक्रारींना वाचा फोडल्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते. प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांचे त्यातून मनोधैर्य खच्ची होते. अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा ओळखण्यात सरकार जरा जास्तच विलंब लावत आहे. काही निष्पन्न होत नसेल, तर हे पातक का करा? तुमच्याही काही अडचणी असतील हे मान्य करु या.

पिडीत तृतीयपंथी रेश्माने माझ्यासमोर एक विधान केले आहे, ती भावना मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रेश्मा म्हणते, आम्ही तृतीयपंथी आहोत, त्यामुळे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते आहे! आम्हाला न्याय देत नाही. आम्ही माणसे नाहीत का? त्यानंतर रेश्मा मनापासून एक आशीर्वाद देते, लोकांनी मुठमुठभर धान्य आम्हाला दिले होते. त्यातून बंदी काळात, आम्ही आमच्या वाड्यातील सर्वांच्या पोटाची खळगी भरु शकलो. त्या सर्वांचे भले होवो! डहाणूतील सर्व लेकरांना सुख आणि समाधान लाभो! हे आशीर्वाद डहाणूकरांची जबाबदारी वाढवणारे आहेत.

डहाणूतील लोक तृतीयपंथीयांना वाऱ्यावर सोडायला तयार नाहीत. जाऊ दे कोणावरही काहीही कारवाई करु नका! पण पोलिसांनी वसूल केलेली खंडणी त्या तृतीयपंथीयांना मिळवून देण्यात आपण कमी पडत असलो तरी, लोक तुमच्या पाठीशी आहेत. लोक तृतीयपंथीयांना स्वतःच्या खिशातून भरपाई द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त वेळ द्या, ही भरपाई तुमच्या शुभहस्ते द्यायची आहे. त्यातून तृतीयपंथीयांना आपण माणसे मानतो, असा संदेश जाईल. आणि त्याची आता आवश्यकता आहे. तुम्हाला वेळ नसेल तर एखाद्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला सांगा. त्यांच्या हस्ते मदत देऊ. अगदी राष्ट्रवादीचे पालघर जिल्ह्यातील आमदार सुनील भूसारा यांच्या हस्ते दिले तरी चालेल. कृपया, लवकरात लवकरची वेळ कळवा.

आणि हो जमले तर गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका! तृतीयपंथी व परिसरातील लोकांमधील तणाव निवळण्यासाठी काही करता आले तर कृपया अवश्य करा. त्यांच्यात सामंजस्य निर्माण होईल यासाठी काही प्रयत्न करता आले तर उत्तमच. तृतीयपंथीयांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. ती नष्ट करा. लोकांवर कारवाया करुन असे प्रश्न सुटत नाहीत हे मी सांगायला नको.

संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
[email protected]
9890359090

ह्या संदर्भातील खालील बातम्या अवश्य वाचा:-