करोना निर्बंधांची पायमल्ली : हॉटेल, दुकानदारांसह रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल!

विना मास्क वावरणार्‍या 29 जणांवर दंडाची कारवाई!

0
2168

पालघर, दि. 8 : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची पायमल्ली करणार्‍यांवर पालघर पोलीस दलातर्फे दैनंदिन कारवाई करण्यात येत असुन काल, 7 एप्रिल रोजी जिल्ह्यातील विविध भागातील हॉटेलमालक, दुकानदार व रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर सार्वजनिक स्थळी विनामास्क वावरणार्‍या 29 जणांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईसरमधील देवीकृपा नामक हॉटेल जिल्हाधिकार्‍यांनी निर्धारीत केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवल्याने हॉटेलच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे डहाणूतील कासा हद्दीतील सायवण नाका येथील लोहार कामाची दोन दुकाने, रिध्दीसिध्दी मोटर गॅरेज (कासा), पालघर येथील गुरुकृपा कॅटरर्स, खानपाडा येथील टिंबर दुकान, पालघर – देवीसा रोडवरील किराना मालाचे दुकान, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील जनरल स्टोअर्स, बोईसरमधील तारापुर माळीस्टॉप येथील सलुनचे दुकान, पास्थळ नाका येथील एक दुकान (नाव समजू शकलेले नाही), विक्रमगडमधील कुंभारआळी येथील ड्रेस मेकर नावाचे टेलरचे दुकान, बोईसर खैरापाडा येथील एक दुकान (नाव समजू शकलेले नाही), मनोर येथील सुपर रेंजर स्टाईल नामक कपड्याचे दुकान, महालक्ष्मी ड्रायफुड नावाचे दुकान, महादेव किराणा मालाचे दुकान, विक्रमगडमधील माऊली किराणा स्टोअर्स व सफाळ्यातील कुर्लाई जनरल स्टोअर्स नामक दुकानावर शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन न केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 रिक्षा चालकांवर कारवाई!
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही काही निर्बंध जारी केले आहेत. त्यात वाहनांनुसार प्रवासी क्षमता ठरवून देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याने तलासरी पोलिसांनी जि.जे.15/एक्स.एक्स.3714, जि.जे.15/वाय.वाय.5442 व जि.जे.15/एक्स.एक्स.3504 या क्रमांकाच्या रिक्षांच्या चालकावर गुन्हे दाखल केले आहेत.

विनामास्क वावरणार्‍या 29 जणाांवर कारवाई!
दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागात सार्वजनिक स्थळी विनामास्क वावरणार्‍या 29 जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून 9 हजार 400 रुपयांचा दंड वसुल केला आहे.