राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत डहाणूतील शिक्षकाची प्रथम पारितोषिक पटकावण्याची हॅट्रिक

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. सन 2019- 20 साठी देखील सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.एल.पोंदा हायस्कूल या माध्यमिक शाळेतील शिक्षक बाळासाहेब रघुनाथ चव्हाण यांच्या निबंधाला सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

यंदाच्या वर्षी माहिती तंत्रज्ञानाचा गुणवत्ता विकासासाठी उपयोग, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक, माझे नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, जल व्यवस्थापन आणि जल सुरक्षेत शिक्षणाची भूमिका, ज्ञानरचनावादानुसार अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे अपेक्षित स्वरूप आदी पाच विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी एका विषयावर 3000 शब्दात स्वहस्ताक्षरात निबंध लिहायचा होता. के.एल.पोंदा हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी माहिती तंत्रज्ञानाचा गुणवत्ता विकासासाठी उपयोग या विषयावर निबंध लिहिला होता. त्यांच्या निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

सन 2017-18 मध्ये याच स्पर्धेत चव्हाण यांच्या शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे- काळाची गरज या निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर सन 2018-19 मध्ये शालेय शिस्तीच्या समस्या व उपाययोजना या निबंधाला सलग दुसर्‍या वर्षीही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेऊन तिन्ही वर्षी प्रथम  क्रमांकाचे पारितोषिक मिळविण्याची हॅट्रीक चव्हाण यांनी केली आहे.  रोख रक्कम रुपये 5 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काल, मंगळवारी (दि. 11) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते चव्हाण यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

दरम्यान चव्हाण यांना आशा फाउंडेशन इंडिया तर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2019-20 मध्ये माझा मोठा होण्याचा प्रवास या निबंधास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर दुर्वांकुर फाउंडेशन ठाणे संचलित, संलग्न नेहरू युवा केंद्र ठाणे (युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) आणि दैनिक जनतेचा जनदूत आयोजित राष्ट्रस्तरीय मराठी निबंध स्पर्धा 2019-20 मध्ये 370 कलम रद्द : शासनाचा विधायक निर्णय या निबंधास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच महाराष्ट्र शासन वनविभाग,  डहाणू तर्फे वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित निबंध स्पर्धा 2019-20 मध्ये मानव वन्यजीव संघर्ष – लोकांसाठी गरजेची जागरूकता या निबंधास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे अशा या अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी बद्दल चव्हाण यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.