तुंगा हॉस्पिटल प्रकरण : प्रशांत संखेंवरील गुन्हा मागे घ्या, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन करु!

0
2940

भाजप जिल्हाध्यक्षांचा इशारा

पालघर, दि. 10 : बोईसर येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये काल, 1 मे रोजी बिलाच्या रक्कमेवरुन घडलेल्या कथित मारहाण व तोडफोडीच्या प्रकारानंतर भाजपाचे पदाधिकारी प्रशांत संखे यांच्यावर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 353 (अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्यावर असताना त्याला कर्तव्यापासुन रोखण्यासाठी हल्ला किंवा दमदाटी करणे) नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर पालघर जिल्हा भाजपातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली असुन राजकीय दबावापोटी संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संखे यांच्यावरील 353 कलम त्वरीत हटवावे, अन्यथा भाजप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पालघर पोलीस अधिक्षकांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

तुंगा हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार घेतलेल्या अशोक माने नामक रुग्णाचे बिल जास्त आल्याबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या भाजपाच्या बोईसर येथील जिल्हा सचिव प्रशांत संखे यांच्यावर कुठलीही वास्तविक परिस्थिती न पाहता, त्यांच्यावर 353 सारख्या कलमाखाली आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहता खाजगी दवाखाने अशा पध्दतीने अवास्तव बिल रुग्णांकडून वसूल करीत आहेत. त्यात बोईसरचे तुंगा हॉस्पिटल आघाडीवर आहे. या परिस्थितीत आपण योग्य विचार करून घडलेल्या घटनेची संपुर्ण शहानिशा करून निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र आपण सामान्य जनतेची व रुग्णांची बाजू न घेता खासगी रुग्णालयाची बाजू घेऊन बाजप पदाधिकार्‍यावर 353 सारखा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आपण कुणाच्यातरी राजकीय दबावाखाली येऊन अशा पध्दतीने भाजपाच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार करीत आहात, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले असुन संखे यांच्यावर लावण्यात आलेले 353 कलम हटवून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा पालघर भाजपा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

  • काय आहे प्रकरण?
    तुंगा या खाजगी रुग्णालयात करोनावर उपचार घेतलेल्या रुग्णाला 86 हजार रुपयांचे बिल देण्यात आले होते. बिलाची रक्कम जास्त आकारल्याच्या भावनेतून रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल कमी करण्याच्या हेतूने प्रशांत संखे यांना रुग्णालयात बोलावले होते. यावेळी बिल कमी करण्याच्या मागणीवरुन उद्भवलेल्या वादातून संखे यांनी रुग्णालयातील करोना उपचार केंद्राचे व्यवस्थापक संतोष शेट्टी यांना कानशिलात लगावली. तसेच रुग्णालयातील साहित्यांची देखील उपस्थित जमावाकडून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संखे यांना अटक केली आहे.