विक्रमगड मतदारसंघात भाजपमध्ये फूट : हेमंत सवरांविरोधात तीन बंडखोरांचे उमेदवारी अर्ज

0
1936
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे उमेदवार हेमंत सवरा.

प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे महाआघाडीचे उमेदवार हेमंत सवरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र सवरांच्या उमेदवारीला विरोध असलेले भाजपाचे विक्रमगड विधानसभेतील दिग्गज नेते हरीश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले आणि मधुकर खुताडे यांनी बंडखोरी करत व एकत्रित रॅली काढत आपले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाला मोठा हादरा बसला आहे. पक्षाने स्थानिक आदिवासींवर अन्याय केला असून या घराणेशाहीला आम्ही विरोध करीत असल्याचे सांगत या अपक्षांनी सवरांना खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे विक्रमगड विधानसभा निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

भाजप बंडखोर उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

भाजप-सेना महायुतीतर्फे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे हेमंत सवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र भाजपाचे विधानसभेचे दावेदार समजले जाणारे हरीशचंद्र भोये, सुरेखा थेतले, मधूकर खुताडे यांचा सवरांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होता. त्यानंतरही पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिली गेल्याने नाराज झालेल्या हरीशचंद्र भोये, सुरेखा थेतले व मधूकर खुताडे यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हेमंत सवरांनी जव्हार स्टेडीयम येथून रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत, आरपीआयाचे सुरेश जाधव, भाजपाचे बाबाजी काठोळे आदी उपस्थित होते. यानंतर लागलीच तिन्ही अपक्षांनी रॅली काढून व भाजपाचेच झेंडे वापरुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली असुन भाजपचा उमेदवार नेमका कोण? असा प्रश्न मतदारांपढे निर्माण झाला होता.

दरम्यान, पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून आदिवासींवर अन्याय केला आहे. घरणेशाहीला आमचा विरोध असुन त्यातही बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज भरले आहेत. चर्चेअंती आमच्यातील एकाचा उमेदवारी अर्ज कायम करणार असून सवरांचा पराभव करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घ्यायला जावू, असे भोये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे बंडखोरी केलेल्या या अपक्षांसोबत सरचिटणीस विजय औसरकर, प्रविण संखे व नगरसेवक कृणाल उदावंत यांसारखे भाजपाचे दिग्गज दिसल्याने भाजपात मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.

महाआघाडीच्या सुनिल भुसारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

दरम्यान, आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या सर्वच उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महाआघाडीच्या सुनिल भुसारा यांनी जव्हार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथूनच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढली. यावेळी सीपीएमचे प्रदेश कमिटीचे सदस्य रतन बुधर, काँग्रेसचे सोमनाथ किरकिरा, बळवंत गावीत, जमशीद शेख तर बविआचे दत्तात्रय घेगड आदी महाआघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सातव्या दिवशी 26 उमेदवारांचे अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या काल (दि.3) सातव्या दिवशी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांमध्ये 26 उमेदवारांकडून एकुण 41 नामनिर्देशनपत्र दाखल. यात डहाणूतुन 5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशनपत्र, विक्रमगडमध्ये 5 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र, पालघर मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्र, बोईसर मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र, नालसोपार्‍यात 10 उमेदवारांनी 15 नामनिर्देशनपत्र, तर वसईमध्ये 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.