डहाणू : आगवन शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे

0
2901

प्रतिनिधी/डहाणू, दि. 22 : येथील पतंजली योग समिती मार्फत मागील काही वर्षांपासून तालुक्यातील विविध भागात योग साधनेची शिबिरं घेऊन त्याविषयी माहिती दिली जात आहे व नागरिकांना योगाचे विधिवत प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून योग प्रशिक्षक जंगम यांनी आगवन येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे शिबिर घेऊन त्यांना योगाचे धडे दिले.

विद्यार्थी दशेतील मुलांना नविन काहीतरी शिकण्याची जिज्ञासा असते. या वयात त्यांचे शरीर लवचिक असते व या वयातच व्यायामाची आवड जोपासली जाऊ शकते, या बाबी लक्षात घेऊन पतंजली योग समितीचे योग शिक्षक जंगम यांनी आगवन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना योग साधनेचे महत्त्व सांगून योग साधनेतील विविध आसने व प्राणायामाचे विविध प्रात्यक्षिक दाखवले. तसेच शारीरिक व्यायाम, रोजचा अभ्यास व त्यासाठी आवश्यक स्मरणशक्ती यांचा परस्पर संबंध कसा आहे हे देखील विद्यार्थ्यांना समजावून दिले. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठ्या आनंदाने या शिबिरात सहभाग घेतला. दरम्यान, पतंजली योग समिती मार्फत डहाणूतील विविध भागात होत असलेल्या योग शिबिरांत आपल्या पालकांना जाण्याचा आग्रह आपण करावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.