मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करावी; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

0
3139

पालघर, दि  29 :  कोव्हीड 19 (कोरोना) मूळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी  राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमाना बंदी असून जिल्ह्यातील प्रत्येक मुस्लिम बांधवाने बकरी ईदच्या दिवशी ईदची नमाज मस्जिद, इदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरातूनच अदा करावी, अशी विनंतीवजा आवाहन आज जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले. तसेच सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार व कत्तलखाने बंद असून नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बाणी करावी, अशी महत्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आली.

शासनाच्या बकरी ईद २०२० बाबत मार्गदर्शक सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे प्रतिनिधी व मौलवी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे व पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थितांना आवश्यक सूचना दिल्या. रमजान ईदच्या वेळी मुस्लिम बांधवांनी जसे सहकार्य केले तसेच सहकार्य यावेळी ही करतील, अशी आशा देखील जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.

बकरी ईदच्या निमित्ताने एकत्र येणे टाळणे, सर्वांसाठी बंधनकारक असून शासनाने जे नियम सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले आहेत ते पाळणे सर्वांच्या हिताचे आहेत, असे सांगून सर्व धार्मिक सणांमध्ये अशीच परिस्थिती असणार आहे. येत्या दीपावली पर्यंत तरी सार्वजनिक स्वरूपात सण साजरे करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.  शिंदे यांनी  केले.