पालघर, दि. 3 : तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायत हद्दीतील गुरचरण म्हणून राखीव असलेल्या जमिनीपैकी तब्बल दिड एकर जमिनीवर आलेवाडी येथील स्थानिक श्री रविंद्र नाईक यांनी बेकायदेशीररित्या केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने काल, बुधवारी उद्ध्वस्त केले आहे.
नांदगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. 19, गट क्र. 176 या गुरचरण जमिनीवर हे अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 52 व 53 नुसार हे अतिक्रमण बेकायदेशीर ठरवून ते जमिनदोस्त करण्याचा ठराव घेण्यात आला. यानंतर तात्काळ कारवाई करत अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले.
कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शर्मिला राऊत यांनी दाखवून दिले असल्याची भावना व्यक्त करत या कारवाईबाबत स्थानिकांनी त्यांचे कौतूक केले आहे. दरम्यान, अतिक्रमण कारवाईदरम्यान नांदगावचे उपसरपंच राकेश पाटील, सदस्य सुमित ठाकुर, धिारज गायकवाड व तृप्ती गावड आदी उपस्थित होते.