
दि. १५: सुप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कलेची सेवा केली. १९७६ साली त्यांना शासनातर्फे ३.५ एकर जमीन देण्यात आली होती. मात्र अखेरपर्यंत या जमिनीचा कब्जा न मिळाल्याने ह्या जागेत वारली चित्रकलेचे धडे देणारे केंद्र स्थापित करण्याचे म्हसे यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात जिव्या यांना दिल्ली येथील प्रदर्शनात आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. त्यांना १९७६ सालीच राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. म्हसे यांना रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यांना ठिकठिकाणी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आदिवासी समाजाचा सच्चा कलावंत वारली चित्रकार पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनामुळे पालघर जिल्ह्याचा एक प्रतिभावान कलाकार हरपला आहे. आदीवासी चित्रकलेला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून प्रतिभावंत चित्रकार आपल्यातून निघून गेला. त्यांची उणीव सदैव भासेल. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
विजयी खरपडे
अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर