पॉलिश करण्याच्या बहाण्याने दहा तोळे सोने लंपास

0
2343

WADA SONE LAMPASS>> आरोपी कॅमेर्‍यात कैद

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : भांडी व सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन महिलांना गुंगारा देऊन त्यांच्याकडील दहा तोळे सोने घेऊन दोन चोरटे पसार झाल्याची घटना वाड्यात घडली असुन या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास वाड्यातील राम मंदिराजवळ राहणार्‍या वैभव गंधे यांच्या घरात पत्नी विना गंघे व त्यांच्या आई अशा दोघीच असताना दोन चोरटे प्रथम तांब्याची भांडी पॉलिश करून देतो असे सांगुन घरात घुसले. यावेळी त्यांनी भांडी स्वच्छ करून दाखवत आम्ही सोने देखील पॉलिश करून देतो, असे सांगत वैभव गंधे यांच्या आईला विश्वासात घेत त्यांच्या हातातील पाच तोळ्याच्या बांगड्या व पाच तोळ्याचे गंठण असे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने काढून घेतले व गॅसवर पाणी तापत ठेऊन दोघींना आपली कामे करा; थोड्याच वेळात दागिने पॉलिश होतील, असे सांगितले. चोरट्यांच्या सांगण्यावरुन दोघी तेथून जाताच अवघ्या काही मिनिटातच दोघेही तेथून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली असुन त्यानुसार दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शेजारील घरासमोर लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात दोघेही चोरटे कैद झाल्याने पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!