>> शिवसेनेकडे वाडा नगर पंचायतीच्या चार पैकी तीन समित्या
वाडा, दि. 8 : वाडा नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांसाठी आज, मंगळवारी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे तीन तर मित्र पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या एक सदस्याला बिनविरोध विजय मिळाला आहे. या निवडणूकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
वाडा नगरपंचायतीमध्ये मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआयला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. यावेळी विषय समित्यांच्या वाटपाबाबत वाटाघाटी करण्यात आल्या होत्या.
वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाल्याने या पदावर शिवसेनेच्या गितांजली कोलेकर विराजमान असून आज झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे यांची बांधकाम समितीच्या सभापतीपदी, जागृती काळण यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी व शुभांगी धानवा यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे वसीम शेख बिनविरोध निवडून आले.
वाडा नगरपंचायतमध्ये एकुण 17 सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना 6, भाजपा 6, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआय आदी पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. नगरपंचायतीच्या पहिल्याच वर्षी काँग्रेस व आरपीआयने शिवसेनेला पाठिंबा देऊन दोन विषय समिती सभापती पदे पदरात पाडून घेतली होती.
दरम्यान नवनिर्वाचित सभापतींना शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, शहर प्रमुख प्रकाश केणे, अरुण पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, संगिता ठाकरे, मनाली फोडसे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, दिलीप पाटील, बहुजन विकास आघाडीचे अनंता भोईर, देवेंद्र भानुशाली, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, गटनेते मनिष देहेरकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!