डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारेंचे कोरोनाबाधेमुळे निधन

0
3656

डहाणू दि. 12 एप्रिल: डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे मुंबई येथील नानावटी इस्पितळात निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 कन्या व 1 मुलगा असा परिवार आहे. पास्कल यांना जवळपास 10 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे वापी (गुजरात) येथील रेन्बो इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी, (11 एप्रिल) त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र आज पहाटे 4.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कालच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे (तलासरी) यांचेही कोरोनामुळे अकाली निधन झाले होते.

भाजपचा खंदा कार्यकर्ता: पास्कल धनारे हे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते होते. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना भाजपातर्फे डहाणू मतदारसंघात उमेदवारी मिळाली व ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी 6 वर्षे भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजपची सत्ता येण्यात त्यांचा मोठा हातभार होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूकीत तलासरी भाजपमध्ये झालेली बंडखोरी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेला पाठिंबा यामुळे पास्कल यांचा पराभव झाला होता. पराभवाने खचून न जाता पास्कल यांनी पक्ष संघटनेचे काम नेटाने पुढे चालू ठेवले होते. ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजप विजयी होण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

तलासरी तालुक्यातील 11 एप्रिलची स्थिती: तलासरी तालुक्यात 10 एप्रिल रोजी 27 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. त्याआधी 9 एप्रिल रोजी 16, 8 एप्रिल रोजी 23, 7 एप्रिल व 6 एप्रिल रोजी प्रत्येकी 6, 5 एप्रिल रोजी 4 नवे रुग्ण अशा चढत्या आलेखाने कोरोना बाधीत निष्पन्न झाले होते. 11 एप्रिल रोजी तलासरी तालुक्यात एकूण निष्पन्न झालेल्या 452 कोरोना बाधितांपैकी 308 रुग्ण बरे झाले होते व 139 रुग्णांवर उपचार सुरु होते. मृत्यूचा आकडा 5 होता. पास्कल धनारेंच्या मृत्यू नंतर हा आकडा 6 वर पोहोचला आहे.

डहाणू तालुक्यातील 11 एप्रिलची स्थिती: डहाणू तालुक्यात 10 एप्रिल रोजी नवे 43 कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. त्या आधी 9 एप्रिल रोजी 58, 8 एप्रिल रोजी 78, 7 एप्रिल रोजी 5, 6 एप्रिल रोजी 24, 5 एप्रिल रोजी 14, 4 एप्रिल रोजी 19, 3 एप्रिल रोजी 26, 2 एप्रिल रोजी 52 व 1 एप्रिल रोजी 30 असा कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. डहाणू तालुक्यात आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 2739 कोरोना बाधितांपैकी 2348 रुग्ण बरे झाले असून 349 जणांवर उपचार सुरु आहेत. 42 जणांनी आपला जीव गमावला आहे.