राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार उद्या (11 ऑक्टोबर) डहाणूत

0
3454

डहाणू दि. 10 ऑक्टोबर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार हे उद्या (11 ऑक्टोबर) डहाणूत येत आहेत. ते दुपारी 12 वाजता राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ पदाधिकारी राजेश पारेख यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येतील. त्यानंतर अलिकडेच वृद्धापकाळाने निधन झालेले माजी उप नगराध्यक्ष कै. रमेशचंद्र कर्णावट व वाणगांवचे कै. मुकूंदआप्पा चव्हाण या निष्ठावान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देतील. श्री शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असतील असे समजते.

उद्या राजेश पारेख यांची शोकसभा

दिवंगत राजेश पारेख यांची उद्या (11 ऑक्टोबर) दुपारी 3 ते 5 दरम्यान त्यांच्या निवासस्थानी (आशिर्वाद बंगला, एस. टी. डेपो जवळ, डहाणूरोड – पश्चिम) शोक सभा आयोजीत करण्यात आली आहे. लोकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन व मास्क परिधान करुन सहकार्य करावे असे आवाहन पारेख कुटूंबीयांतर्फे करण्यात आलेले आहे.