-
या सहलीत सामील झालो नसतो तर ती चूक ठरली असती असे प्रत्येकाला वाटले. ही सहल म्हणजे एक मेडीटेशनच होते. जे सहलीत आले नाहीत त्यांनाही ते न आल्याची रुखरुख नक्कीच वाटेल.
-
निसर्गसौंदर्याने नटलेल्या, मिनी माथेरान म्हणून ओळख असलेल्या जव्हार मध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. जव्हार मध्ये एसएससी पर्यंतचे शिक्षण घेणारे आम्ही तीस-पस्तीस मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात असतो. यातले काहीजण अजून परस्परांना भेटू शकलेले नसले तरी व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही परस्परांशी जोडलेले आहोत.
खरेतर 1983 साली एसएससी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आम्ही पुढील शिक्षणासाठी किंवा अन्य कारणांसाठी विखुरले गेलो होतो. तेव्हापासून 32 वर्षांनंतर नोव्हेंबर 2011 मध्ये आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात आम्ही मित्र मैत्रिणी जव्हार मध्ये परस्परांना भेटलो. तेव्हापासून आम्ही अधेमधे परस्परांना भेटत असतो. सर्वांनाच सर्व वेळी जमतेच असे नाही. परंतु त्यातील काहीजण मात्र परस्परांशी घनिष्ठ मैत्री टिकवून आहेत.
आमच्यामध्ये शांत, बोलके, अभ्यासू, उत्साही, अति उत्साही, कळखोर, समंजस, उच्चशिक्षित, कमी शिक्षित, नोकरदार, व्यापारी, अधिकारी, प्रेमळ, खडूस, मृदू, रोखठोक, चुगलखोर, आत्मकेंद्री, सर्वांचा विचार करणारे अशा सर्व व्हरायटीज आहेत. त्यामुळे अश्या सर्व व्यक्तिमत्त्वांचा आंबट गोड आस्वाद आम्ही लुटत असतो. अर्थात अप्रिय गुणांची व्यक्तिमत्वे आमच्याकडे चवीपुरतीच आहेत. प्रत्येकाच्या स्वभावात बालपणीच्या बर्याचश्या छटा सापडतात. आज समाजात कोणी कितीही प्रतिष्ठा मिळवलेली असली तरी आम्ही परस्परांशी समान पातळीवर भेटत असतो. कोणीही कोणालाही कशी ही वागणूक देऊ शकतो. अगदी लहानपणी, अजाणतेपणी वागत होतो तसेच. त्यातून कोणी क्षणभर दुखावलाही जातो. पण अखेर सर्व क्षम्य होतं. पुन्हा भेटताना आम्ही निर्मळ मनानेच भेटतो. एकमेकांना पाहिल्यानंतर, भेटल्यानंतर आम्ही आमची वये, आमची मॅच्युरिटी सर्व गुंडाळून ठेवतो. त्यामुळेच बालपणात रमण्याचा आनंद आम्ही पन्नाशीतही घेऊ शकतो आहोत आमच्या मित्र-मैत्रिणींपैकी अनेकां विषयी बोलण्यासारखे खुप आहे. परंतु तो स्वतंत्र विषय होईल. आता मात्र केवळ कास पठारावर आम्ही कसे बालपणात रमलो याचा थोडक्यात शब्दप्रपंच मांडत आहे.

यावर्षी देखील कास पठारावरील फुले फुलल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. अशा एका बातमीचे कात्रण सतीशने व्हॉट्स ॲप गृपवर टाकले. पुन्हा चर्चा सुरु झाल्या. कोण येणार? कसे येणार? कसे जायचे? हे नेहमीचे प्रश्न सुरु झाले. हे प्रश्न मांडता मांडता मध्ये मध्ये सर्वांना भरपूर ज्ञान देऊन सकल जनांना ज्ञानी करुन सोडावे या भावनेने काही मित्र व्हॉट्स ॲप वरुन सतत काहितरी फॉरवर्ड मॅसेज टाकत असतात. त्यात हे प्रश्न हरवले जाऊ लागले. मग कॉन्फरन्स कॉलद्वारे तारखा ठरल्या. 20 तारखेला मोहरमची सुट्टी त्याला जोडून एक दिवसाची सुट्टी घ्यायचे ठरले. तारखांना माझ्यासकट, सुजल वैद्य (लग्नानंतर मधुरा कुलकर्णी), मेघा राजहंस (लग्नानंतर जोशी), सतीश करमरकर, दिनेश तारवी, सुनीता वैद्य (मनाली जोशी), सुनील शिंदे यांनी पहिल्या फेरीतच सहमती दर्शवली. यावेळी सर्वांनी मध्यवर्ती अशा ठाणे येथे एकत्रित येऊन तेथून एका वाहनाने जायचे असे ठरले. मग नाव नोंदणी सुरु झाली. किती जण येणार ते ठरत नव्हते. मग वाहन किती आसनी असावे हे देखील ठरत नव्हते. कोणी सहजच होकार देणार, तर कोणी व्यस्त असणार आणि कोणी उपलब्ध असताना आढेवेढे घेऊन आपले महत्व वाढवणार असे सर्व येथे चालते. आणि आमचा सतीश या सर्व प्रकाराची सर्वाधिक मजा लुटणार. पण यावेळी आमच्या मैत्रिणी सुजल वैद्य (लग्नानंतर मधुरा कुलकर्णी) आणि मेघा राजहंस (लग्नानंतर जोशी) यांनी मनावर घेतले. त्यांना मात्र आम्ही गांभीर्याने घेतले. अंदाजे 10 ते 12 जण येतील या अंदाजाने ठाण्यात रहाणाऱ्या सुजलने स्वतः 13 आसनी वाहन ठरवून टाकले. पुण्यात रहाणाऱ्या मेघाने कास पठारानजिकच्या रिसॉर्टचे बुकींग व सर्व व्यवस्थेची जबाबदारी घेतली. आता आम्ही खरोखरीच कासला पोहोचू अशी चिन्हे दिसू लागली. सतीशने वेगवेगळ्या मित्र मैत्रिणींना कास सहलीला येण्यास प्रवृत्त केले. मित्र मैत्रिणींना त्यांच्या कलेकलेने घेण्याची सतीशमध्ये भारी कला. तो कौतुक केव्हा करतो आणि मस्ती केव्हा करतो ते अनेकांना कळतच नाही. थोडक्यात मस्ती करता करता तो एखाद्याला चढवून राजी करु शकतो. पण आता पन्नाशीमध्ये काही जण सावध देखील झाल्याचे यावेळी समोर आले.
म्हणता म्हणता यावेळी 12 जण नक्की झाले असले तरी त्यात ज्यांना कासला जायची आस होती व आम्ही मिस करु असे काही मित्र मैत्रिणी नव्हते. पूण्यात रहाणारी, कार्यक्रम आखताना अग्रस्थानी असलेली सुनीता वैद्य न टाळता येणाऱ्या कारणासाठी येऊ शकणार नव्हती. आमचा शासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी पदावर असलेला, अध्यात्माची समज असणारा सरळमार्गी मित्र अशोक पाटील याला सुट्टी मिळाली नाही. मनात काही साठवू न शकणारी अशी भोळी मैत्रिण जयश्री मेहता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकली नाही. आम्ही जव्हारला गेलो की निरोप देताना ज्याच्या सहज डोळ्यात पाणी येते असा नगरपालिका सेवेत असलेला अतुल पिंपळे यालाही सुट्टी मिळाली नाही. औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेली रंजना गटणे (लग्नानंतर निंबाळकर) हीला आम्ही अजून भेटलेलो नाही. तिला आणि आम्हाला एकमेकांना भेटायचे आहे. पण ती देखील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इच्छा असताना येऊ शकली नाही. आमचा हॉटेल व्यावसायिक मित्र गिरीश शेट्टी हा दुबईत असल्याने उपलब्ध नव्हता. जव्हार मधून कोणी मित्र मैत्रिण निघाल्यास तेथून विमल जोशी येण्यास इच्छूक होती. पण तिचे नक्की होत नव्हते. आमचा सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारा निसर्गप्रेमी मित्र अनिल तामोरे याने व्यावसायिक बैठक ठरल्याच्या कारणाने नकार दिला. प्रत्यक्षात 20 तारखेला सकाळी 8 वाजता सर्वांनी ठाणे येथे भेटायचे ठरले असताना आधी येण्याची निश्चिती करुन ऐनवेळी जव्हारचा अतुल नंदकर उर्फ पप्या आणि नाशिकचा दिनकर गांगुर्डे यांनी बिंधास्तपणे दांडी मारली. डहाणूहून राजश्री मुकणे (लग्नानंतरची जाधव), राजेश धुमाळ, अजित चंपानेरकर, पालघरहून दिनेश तारवी भल्या पहाटे 4 वाजता उठून तयारी करुन पहाटे 5 वाजता निघाले आणि सकाळी 8 च्या आत ठाणे येथे सुजल कडे पोहोचले. अर्थात राजेशच्या सुचनेप्रमाणे अजितने त्याला सकाळी 4 वाजता तो उठेपर्यंत कॉल लावले. म्हणून राजेश वेळेत आला. मी आदल्या दिवशी ठाणे मुक्कामी होतो. ठाणेकर सुनील शिंदे आणि सतीश करमरकर वेळेत हजर होतेच. जव्हारहून विमल जोशीचे पती नंदू यांनी स्वतः विमलला ठाणे येथे सोडले. जिच्या येण्याची निश्चिती नव्हती ती विमल पतीने पुढाकार घेतल्यामुळे आमच्यात सहभागी झाली होती. मेघा पुण्यातून सहभागी होणार होती. 10 जणांचा कोरम पूर्ण झाला. सुजलकडे चहापान करुन आम्ही एकदाचे कासकडे निघालो. आम्ही चक्क कासला जायला निघालो होतो.
खरा कोरम पूणे येथेच पूर्ण होणार होता. तेथून मेघा येणार होती. आमचे एखादे गेट टूगेदर ठरण्यात मेघा आणि सुजलचा सहभाग महत्वाचा असतो. कोणीही एक तयार झाली म्हणजे दुसरी तयार होतेच. एक उपलब्ध नसेल तर दुसरी नसते. सूजलला शक्य नसेल तर ती ठामपणे नकार देते. आणि होकार कळवला तर ताकदीने प्लॅन करते. मेघा सहसा नकार देत नाही. तीला शक्य नसेल तर हळूच सूजलला नकार कळवते. मग सूजल नकार देते आणि मेघाला नकार द्यायची वेळ येत नाही. सूजल सुरुवातीला थोडी खडूस असावी असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात ती वरुन नारळाप्रमाणे आणि आतून खोबऱ्याप्रमाणे सॉफ्ट असल्याचा अनुभव आला. आमच्या एकत्र येण्यात सुरुवातीपासून सुजलची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. तिचे पती सचिन हे देखील आम्हाला आमचे वर्गमित्र असल्यासारखेच वाटतात. त्यामुळे सूजल हे आम्हा मुलांचे ठाण्यातील हेडक्वार्टरच आहे. मेघा सहसा पुण्याच्या जवळील ठिकाणे निवडते आणि असे सोईचे ठिकाण नक्की झाल्यास तिचा आनंद द्विगुणित होतो. कास पठार हे तिला तुलनेने जवळ असल्यामुळे ती एकदम खूष होती. पूण्यात किंवा जवळपास कधीही टूर काढा, मेघा आम्हाला एकदम आश्वस्त करते. कुठल्याही कार्यक्रमात तीचे वर्तन उर्जादाई असते. सर्वांशी जुळवून घेण्याचा स्वभाव आणि क्षम्य वृत्ती ही तिची श्रीमंती. कार्यक्रमाच्या नियोजनातील तिची कल्पकता भारी असते. ठाणे ते पूणे आमचा प्रवास अडीच तासात झाला. मेघा तिथे वाट पहातच होती. तेथे तिच्याकडे सर्वजण फ्रेश झाले. तिने पूणेरी मिसळीचा बेत आखला होता. त्यावर सर्वांनी ताव मारला आणि कोरम पूर्ण करुन आम्ही साताऱ्याच्या दिशेने निघालो.
या दरम्यान दिनेश तारवीने नसरापूर येथे एक छोटा ब्रेक घेणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही वळलो. एका घरात घुसलो. येथे आपण का आलो आहोत हे कोणालाही माहिती नव्हते. घरात पाऊल ठेवताच दिनेशने आम्हाला खूप मोठी सरप्राईझ दिल्याचे लक्षात आले. आमची एक वर्गमैत्रिण छाया काळे हीच्या घरी आम्ही पोहोचलो होतो. सासू, पती, मुलगा व सुन, मुलगी यांच्यासह कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलणारी छाया आम्हाला 34 वर्षानंतर पहिल्यांदा भेटली होती. ती या आधी आमच्या स्नेहसंमेलनात येऊ शकली नाही आणि यावेळीही आमच्याबरोबर येऊ शकत नव्हती. पण तिच्या दारावरनं जात असल्याने दिनेशने ही संधी साधली. मेहनतीच्या जोरावर छायाच्या कुटूंबाने मोठी प्रगती साधल्याचे दिसत होते. छायाची मुलगी आणि सून इंजिनिअरिंगच्या पदवीचे शिक्षण घेत होते. मुलीला आणि लग्नानंतर मुलीप्रमाणे सुनेला शिक्षण देणाऱ्या छायाच्या परिवाराचा आम्हाला अभिमान वाटला. छाया आणि तिचा पती, मुलगा, मुलगी आणि सून यांना आमच्यासाठी काय करु आणि काय नको असे झाले होते. त्यांचा जेवणाचा आग्रह आम्हाला पुढील नियोजनामुळे स्वीकारता आला नाही. तिचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. दरम्यान जेवण करुन सायंकाळी 5 च्या सुमारास साताऱ्यातून कास पठारावर जाण्यासाठी आम्ही घाट रस्त्याने निघालो. या रस्त्याला लागताच कास पठारावरील सृष्टी सौंदर्याचा अंदाज येऊ लागला. आम्ही सर्वजण हरखून गेलो होतो. सतीशमुळे आमचा सुंदर योग जुळून आला होता.



जेवणानंतर पुन्हा एकदा मैफिल जमली. सर्वांना किती बोलू आणि किती नाही असे झाले होते. कोणी नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला होता, कोणाला पदोन्नती मिळाली होती. कोणी नृत्य शिकत होते, कोणी नवीन व्यवसाय सुरु केले होते तर कोणी व्यवसाय बंद करुन नोकरी सुरु केली होती. कोणी राजकारणात प्रवेश केला होता तर कोणी राजकारण सोडले होते. कोणी नवे घर घेतले होते तर कोणी गावाकडे घर बांधले होते. कोणी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता तर कोणी लेझीम/ढोल/ताशा पथकात सहभागी झाले होते. एक नाही अनेक विषयांवर चर्चा झाली. प्रत्येकाचे प्रगतीपुस्तक समोर आले. भावनिक आणि भोळा असलेल्या दिनेशकडे सर्वांचे प्रगती पुस्तक असते. सर्वांच्याच प्रगतीचे तो जरा वाढवूनच कौतुक करतो. मग मुलाबाळांच्या चर्चा सुरु झाल्या. मुलांच्या शिक्षण आणि वाटचालींवर चर्चा झाल्या. परस्परांविषयी अभिमान वाटावा असे सर्व होते. चर्चा कधी आमच्यातील अनेकांच्या वाढत्या पोटावर आणि टक्कलावर घसरली ते कळलेही नाही. त्याला सडपातळ बांध्याच्या राजेश धुमाळच्या विनोदाची फोडणी होती. अधेमधे एकमेकांना एकमेकांसमोर भिडवण्याचे सामर्थ्य बाळगणाऱ्या सतीशची करामत चालूच होती. या गृपमुळे माझी सहनशक्ती वाढण्यास मोठाच हातभार लागला आहे. या गृपचे एक पात्र होण्याचा मला तो मोठा लाभ होत आहे. कधीकधी मस्ती इतकी छळवादी वाटते की, सतीशने आपण मित्रांनी जव्हारला एकत्रितपणे एखादे फार्म हाऊस बांधू या का? असा प्रश्न करताच खर्च करुन छळछावणी का उभारायची असा माझा प्रतिप्रश्न क्षणात समोर येतो. अशावेळी छळवाद करणारे लहान आहेत (१२/१४ वर्षांचे) आणि आपण पन्नाशीला पोहोचलो आहोत अशी मनाची समजूत घालून परिस्थितीवर मात करावी लागते. अशी तुटेल इतके न ताणता केलेली गंमत मला अन्यत्र कुठेही मिळू शकत नाही. राजश्रीला आता झोप अनावर झाली होती. चला झोपा आणि झोपू द्या अशी कटकट सुरु झाली. आणखी काही जणांना झोप आली होती. विमलला देखील झोप आली होती. पण तिने सहनशक्तीवर भर दिला होता. एखादा झोपायला जायचा आणि न राहवून पुन्हा चर्चेत (शेवटीशेवटी सुरु झालेल्या भंकसमध्ये) सहभागी व्हायचा. शेवटी रात्री 2.30 वाजता आमचे सर्वांचे झोपण्यावर एकमत झाले. सकाळी 8.30 पर्यंत तयार होण्याचे देखील ठरले. दुसऱ्या दिवशीच्या कास पठाराच्या सृष्टीसौंदर्याचा आनंद लुटण्याच्या उत्कंठतेतच आम्ही झोपी गेलो.
सकाळी आम्ही सर्वजण वेळेतच उठलो. आणि ठरल्याप्रमाणे सकाळी 8.30 वाजता कास च्या पठारावर निघालो. तेथील व्यवस्थापन मनात भरण्यासारखे होते. महिलांना रोजगाराच्या बऱ्यापैकी संधी उपलब्ध झालेल्या दिसल्या. आमचे वाहन आम्ही तेथील वाहनतळावर सोडून तेथील सतत ये जा करणाऱ्या बससेवेचा लाभ घेतला. आणि पठारावर पोहोचलो. प्रवेश केल्यानंतर बरेच लांब अंतरापर्यंत कुंपण घातलेले आहे. त्यातून फुले पहाता आली. ते योग्यच आहे. इतके चालल्यानंतर मग कुंपणमुक्त भाग येतो. ज्यांना खरोखरीच फुलांशी प्रेमाने गुजगोष्टी करायच्या असतील ते इथपर्यंत येतात. थोडक्यात म्हणजे आपली परिक्षा झाल्यानंतरच आपण पठारावर बागडतो. तिथेही पायवाटांवरुनच फिरता येते. ठिकठिकाणी असलेले स्वयंसेवक रानफुलांवरुन चालल्यास किंवा फोटोसाठी फुलांशी लगट केल्यास लगेचच शिट्टी वाजवतात. तुम्ही देखील इतके संवेदनशील होता की फुलांवर पाय ठेवायची हिंमत करीत नाही. आम्ही सर्वजण शाळकरी मुलांप्रमाणे फुलांची सैर करु लागलो. मुले शाळकरी वाटत होती. तुलनेत मुली अधिक जबाबदारीने वागत असल्याने महाविद्यालयीन वाटत होत्या. सैर चालू असताना एखादा वनस्पती शास्त्राचा अभ्यासक असावा अशा आविर्भावात वावरणाऱ्या सतिशनी केलेले फुलांच्या सौंदर्याचे कौतुक फुलेही गांभीर्याने घेत असतील असे वाटले नाही. दुपारी 12 वाजता फुलणारी विशिष्ट प्रजातीची फुले सतीशच्या स्तुतीने वेळे आधीच फुलली नाहीत आणि 12 वाजता मावळणारी फुले त्यानंतर मावळायची थांबली नाहीत. फुलांकडून हे शिकण्यासारखे आहे. आपले उमलणे, फुलणे आणि मावळणे दुसऱ्या कोणाच्या मर्जीवर अवलंबून नसते. हे समजायला जे बालमन असायला लागते त्या पातळीवर कदाचित आम्ही आलो असणार. कासवर फुलांशी स्पर्धा करायची म्हणजे अवघड काम. त्यामुळे आम्ही सेल्फीचा मोह पूर्णत: आवरुन फक्त फुलपाखरांप्रमाणे (किंवा हवे तर भोंग्यांप्रमाणे ) बागडलो. असे असले तरी कास पठारावरील संपूर्ण सौंदर्यसृष्टी, प्रत्येक फुल हे परमेश्वराने आपल्या फोटोसेशन साठी निर्माण केल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या मेघा, सुजल आणि राजश्री यांना छायाचित्रणामध्ये कलेची दृष्टी असणारा राजेश धुमाळ म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायचा. मैत्रिणींच्या फोटोसेशन साठी एक ताकदीचा फोटोग्राफर उपलब्ध झाला म्हटल्यावर एक जबाबदारीतून आम्ही मुक्त झालो असे वाटत असताना मुक्तपणे फोटोसेशन करता यावे याकरिता हातात पर्स सांभाळायला देणाऱ्या मैत्रिणी म्हणजे गंमतच होती. त्यातही पर्सेस हातात देऊन तशा अवस्थेतला फोटो काढण्याचा आणि तो व्हाट्सॲप गृपवर टाकण्याचा खट्याळपणाही भारीच होता. राजश्रीतला शिक्षक अधेमधे जागा होत होता. हे का मागे राहिलेत? ते का इतके पुढे गेलेत? हळू चाला! लवकर चला! तुम्हाला समजत नाही का? असे तिचे हटकणे चालूच होते. सुनील तसा आपल्या मर्जीने वावरणारा, निर्मळ मनाचा, कमी बोलणारा असला तरी तो जेव्हा बोलतो तेव्हा नेमकेपणाने षटकार मारलेला असतो. विमल, अजित ही कमीत कमी मस्ती करणारी मुले साखरेप्रमाणे सर्व मजेची गोडी वाढविणारी होती.
बराच वेळ फिरुन झाल्यावर काही जणांना पन्नाशीची जाणीव झाली. कोणाला आणखी पुढे जायचे होते तर कुणाचे गुढगे दुखत होते. सर्वांत लांबून आलेल्या आम्हा डहाणूकरांना वेळेत घरी परतण्यासाठी लवकर परतीचा प्रवास सुरु करायचा होता. जे जे आवडले नाही त्याचा पालापाचोळा तिथेच सोडून केवळ फुलांचा सुगंध सोबत घेऊन आम्ही निघालो होतो. रस्त्यात दुपारचे जेवण घेतले. पुन्हा राहिलेल्या गप्पा टप्पा सुरु झाल्या. प्रवास लवकर संपू नये असे वाटत असताना पूणे आले. मेघाने आम्हाला आग्रह केला. चला सर्वजण आज मुक्काम करा. खरे तर एक दिवस वाढवावासा वाटत होता. पण कोणालाही शक्य नव्हते. निदान चहा पिऊन जा असा आग्रह झाला. चहासाठी थांबणे वेळेच्या नियोजनात बसत नसताना कोणी नकार दिला नाही. चहासाठी तब्बल 1 तास घालवला. त्या वेळेत मग आता पुन्हा केव्हा भेटायचे यावर चर्चा झाली. लवकरच भेटू या इतकेच ठरले. मेघाला निरोप देऊन गाडीत बसलो. पुन्हा ठाण्याला सुजलकडे चहा झाला. चहा घेणे हे केवळ निमित्त होते. 2 गप्पा मारणे हाच इरादा होता. इथे कासच्या सहलीचा समारोप झाला होता. आता आम्ही घरी वेळेत पोहोचू असा विचार करणारे पन्नाशीतले शहाणे झालो होतो. या सहलीत सामील झालो नसतो तर ती चूक ठरली असती असे प्रत्येकाला वाटले. ही सहल म्हणजे एक मेडीटेशनच होते. जे सहलीत आले नाहीत त्यांनाही ते न आल्याची रुखरुख नक्कीच वाटेल.
संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
संपादक – दैनिक राजतंत्र
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!