शिरिष कोकीळ
दि. 13 : रिक्षाचालकांनी भारतीय संविधान समजून घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणू शहरातील रोटरी सभागृह येथे नूतन बाल शिक्षण संघ आयोजित भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर बोलत होते. कार्यक्रमास नूतन बाल शिक्षा संघाचे संचालन समिती सदस्य सुधिर कामत, भारतीय संविधान साक्षरतेच्या कार्यात सक्रीय सहभाग नोंदवणारे जितेन संघवी, विपूल मेहता उपस्थित होते.
पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांनी स्थापन केलेल्या नूतन बाल शिक्षण संघ संचलीत विकासवाडी अध्यापक विद्यालयाला 60 वर्षे पूर्ण होत असून चालू वर्ष हे हिरकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून विविध जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत असून अशा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय संविधान व त्यासंबंधीत विषयांवर देखील व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून काल (12 नोव्हेंबर) रिक्षाचालकांसाठी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील संजीव जोशी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधिर कामत यांनी नूतन बाल शिक्षण संघ आणि पद्मभूषण ताराबई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करुन दिला. त्यानंतर संजीव जोशी यांचे व्याख्यान झाले.
रिक्षा चालक हा दिवसभर रस्त्यावर असल्याने त्याला शहरातील सर्व घडामोडी कळतात. त्यांनी स्वत: भारतीय संविधान, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये समजून घेतली तर ते स्वत: तर सक्षम नागरिक बनतीलच, परंतू अन्य लोकांनादेखील सक्षम नागरिक बनवण्यास मदत करु शकतील असे विचार यावेळी जोशी यांनी मांडले. ते पुढे बोलताना म्हणाले, देशाच्या अंतर्गत सुरक्षीततेसाठी देखील रिक्षाचालक महत्वाची भुमिका बजावू शकतो. तो पोलीसांचे कान व डोळे बनू शकतो. माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधान समजून घेणे जरुरीचे असून केवळ अधिकारांची जाणीव असून चालणार नाही, तर जबाबदारी व कर्तव्यांची जाणीव ठेवली तरच देश जागतीक महासत्ता बनू शकते.
Home संग्राह्य बातम्या रिक्षाचालकांनी भारतीय संविधान समजून घेतल्यास त्याचा समाजाला फायदा होईल! – संजीव...