डहाणू नगरपरिषदेच्या दिनांक 13 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष आणि 25 नगरसेवकपदासाठी होणार्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवार, 18 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही सर्वच पक्ष एकमेकांचा अंदाज घेऊन आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणे पसंत करताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर असून 22 नोव्हेंबरपासून पक्षांना आपले पत्ते उघड करावे लागतील असा अंदाज आहे.
सर्वच पक्षांत आयाराम गयाराम यांची चलती
या वेळी डहाणू नगरपालिका निवडणूकीत अनेक नगरसेवकांनी पक्षांतर केले असल्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभा आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला असून प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरले गेल्यानंतरच हा संभ्रम दूर होणार आहे.
मावळत्या नगरपरिषदेमध्ये 2 स्विकृत सदस्यांसह 25 सदस्य आहेत. या सदस्यांपैकी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 सदस्य आहेत (होते). यामध्ये पक्षात राजेश पारेख व शमी पिरा हे स्विकृत सदस्य, तर राजेंद्र माच्छी, किर्ती मेहता, रेखा माळी, प्रदिप चाफेकर, मिहीर शहा, रमिला पाटील, शशिकांत बारी, रमेश काकड, प्रकाश बुजड, अलका जयदेव मर्दे, तारा तुकाराम बारी, सौ. लिलावती नगिन देवा, आशा अरुण पाठक, प्रकाश गणेश माच्छी, रेणूका राकामुथा यांचा समावेश होता. त्या खालोखाल काँग्रेस पक्षाकडे 5 सदस्य, ज्यामध्ये भरत राजपूत, रुक्साना मझ्दा, मनोज धांगकर, अनुराधा रमेश धोडी, सईद शेख यांचा समावेश होता. शिवसेनेकडे श्रावण भिकारी माच्छी आणि माधुरी हरेश धोडी हे 2 सदस्य आणि भाजपाकडे केवळ आरती आत्माराम ठाकूर या एकमेव सदस्या होत्या.
भाजपा हा सर्वात मोठा आयाराम लाभार्थी
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली रुक्साना मझ्दा, मनोज धांगकर, अनुराधा रमेश धोडी यांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केला. यातील रुक्साना मझ्दा या भरत राजपूत समर्थक नगरसेविकेची ही घरवापसी ठरली. कारण त्या काँग्रेसपूर्वी भाजपाच्या नगसेविका होत्या.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदिप चाफेकर यांनी भाजपच्या दारावर नगराध्यक्षपदासाठी थाप ठोकून पाहीली. प्रदिप चाफेकर हे पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक झाले होते. यामुळे त्यांनी पक्षांतर केल्यास ती घरवापसी ठरली असती. भाजपने आणि राष्ट्रवादीनेही त्यांना गांभीर्याने न घेतल्याने त्यांचे बंडाचे निशाण फडकलेच नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जहाजाला भोक पाडण्याच्या प्रयत्नांचे पातक त्यांच्या माथी लागले.
सर्वप्रथम अलका जयदेव मर्दे, तारा तुकाराम बारी, आशा अरुण पाठक यांनी पक्षांतर केले. त्याचवेळी माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले माजी नगरसेवक रविंद्र फाटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जहाजातून भाजपाच्या जहाजात पाठविले आणि जहाज बदलण्याचा रस्ता तयार केला. रस्ता तयार झाल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बहुसंख्य नगरसेवक भाजपामध्ये दाखल करुन घ्यायचे आणि भाजप ताब्यात घ्यायची असा मिहीर यांचा डाव होता. मात्र तसे झाले नाही. प्रकाश गणेश माच्छी, प्रकाश बुजड आणि नगिन देवा यांच्यासह मिहीर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. हा पक्षप्रवेश गाजावाजा न करता झाल्यामुळे हळूच मागील दारातून प्रवेश केल्यासारखा ठरला. त्याचवेळी भरत राजपूत प्रत्येकाला खिंडीत गाठत होते. दुसर्या दिवशी बुजड आणि देवा यांनी पुन्हा भरत राजपूत यांच्या मार्फत भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष तापत राहीला. यातून भरत आणि फाटक/मिहीर यांच्यामार्फत प्रवेश न करता अनेक नगरसेवकांनी आपापल्या स्तरावर भाजप नेतृत्वाशी चर्चा करुन रस्ते तयार केले. हमखास तिकीटाची खात्री मिळाल्यानंतर रमिला पाटील, शशिकांत बारी, रमेश काकड, रेणूका राकामुथा, शमी पिरा यांनीदेखील भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने 1 सदस्य असलेल्या भाजपकडे काँग्रेसमधून आलेले 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले 11 असे 16 सदस्य गोळा झालेले आहेत.
भाजपमध्ये दाखल झालेले नगिन देवा यांनी काही दिवसांतच पत्नी सौ. लिलावती नगिन देवा यांच्यासह शिवसेनेत प्रवेश घेतल्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या आता 3 झाली आहे.
काँग्रेसचे एकमेव नगरसेवक सईद शेख अजूनही काँग्रेसमध्येच उरले आहेत.
भाजपची स्ट्रॅटेजी यशस्वी
भारतीय जनता पक्षाने 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन त्यांना पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला. यातून भाजपसह राहीले तरच नगरपालिकेच्या तळ्यातले हवे तितके पाणी चाखता येईल हा संदेश पसरला. त्यासाठी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांची बदली करण्यात आली. नवे मुख्याधिकारी विनोद डवले हे भाजपाच्या मर्जीतील असल्याचा व सत्ता राष्ट्रवादीची असली तरी नगरपालिका भाजपच्या मर्जीनेच चालते असा आरोप होऊ लागला. शिवसेनेतून येऊन राष्ट्रवादीत स्थिरावलेल्या विद्यमान नगराध्यक्षा रमिला पाटील यांनी भाजपकडे शरणागती पत्करली. आणि हळूहळू सत्तेची मजा सतत मिळत रहावी यासाठी एकापाठोपाठ एक असे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत.
भाजपची उमेदवार यादी फायनल
भाजपने नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांची यादी अंतीम केली असून त्यामध्ये काँग्रसमधून आलेल्या 4 पैकी 3 आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या 11 पैकी 9 उमेदवारांना तिकीट निश्चित करण्यात आले आहे. ते विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांना पक्षांतर्गत उमेदवारी अर्ज व मुलाखतीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. उर्वरीत 3 आयाराम उमेदवारांना कुठल्या प्रभागात सेट करता येईल याचा विचार चालू असून अन्य 10 जागांसाठी पक्षातील किंवा पक्षाबाहेरील चेहर्यांची चाचपणी सुरु असल्याचे कळते. शिवसेनेला देखील नगराध्यक्षासह 20 ते 22 उमेदवार बाहेरुन मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वत:चे 17 पैकी 5 नगरसेवक उरले असून त्यांचे उमेदवार कोण असतील याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे तर काँग्रेस सर्व जागावर उमेदवार उभे करु शकेल का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
डहाणू नगरपरिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगराध्यक्षपदासाठी मिहीर शहा हे उमेदवार असतील असे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतू मिहीर शहा यांनी सुरुवातीला भाजपामधून त्यांचे मित्र रविंद्र फाटक यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्यासमोर लढणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळविले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजेश पारेख यांना पसंती होती. त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शशिकांत बारी आणि प्रदिप चाफेकर हे 2 इच्छूक होते. बारी यांचा एक पाय भाजपच्या दगडावर असल्याने आणि चाफेकर नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी दोन्ही निवडणूका लढविण्याची मागणी करीत असल्याने त्यांच्यात आत्मविश्वास कमी असल्याचे दिसत होते. शिवाय ते भाजपचा दरवाजा ठोठावून आले होते. अनेक नगरसेवकांचा या दोन्ही उमेदवारांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला विरोध होता. आता बहुसंख्य नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेल्यामुळे या पक्षाकडे प्रदिप चाफेकर हा एकमेव पर्याय उरलेला आहे. दरम्यान भाजपने लाथाडल्यास मिहीर यांना पुन्हा संधी देण्याच्या विचारात राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. मात्र ती वेळ आता टळलेली आहे. राजेश पारेख यांचेही नाव चर्चेत असले तरी त्यांनी आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत.
सध्या हवेवर स्वार झालेल्या भाजपकडे भरत राजपूत हे नगराध्यक्षपदासाठी ताकदवान उमेदवार मानले जात असतानाच रविंद्र फाटक यांनी मिहीर शहा यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करुन नगराध्यक्षपदावर दावा केला. राजपूत आणि फाटक यांच्या स्पर्धेत मिहीर शहा यांनी देखील स्वतंत्रपणे उडी घेऊन मुसंडी मारलेली आहे. आता मिहीर शहा यांनी भाजपमध्ये रविंद्र फाटक यांच्यापेक्षा मुसंडी मारल्याचे दिसत असून भरत आणि मिहीर यांच्यात अधिक तिव्र स्पर्धा आहे. शिवसेनेने हॉटेल व्यावसायिक संतोष शेट्टी यांच्यावर डाव लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवार शोधण्याची अडचण संपली आहे. काँग्रेसकडून अलिकडेच पक्षात व्हाया शिवसेना पुन्हा घरवापसी करणारे केवळ अशोक माळी यांनीच नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीची मागणी केल्याने तेच काँग्रेसचे उमेदवार असतील हे निश्चित आहे.