पालघर, दि . 16 : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणार्या एकुण 30 ग्रामपंचायतींना जिल्हा व तालुकास्तरिय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव व कुर्झे या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय तर अन्य 25 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्रामपंचायतीना हे पुरस्कार देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना, कामडी म्हणाल्या की, पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतींनी चांगले कार्य केले असून तालुका स्तरावरील पुरस्कार घेतलेल्या ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच इतर ग्राम पंचायतींनी पुरस्कार प्राप्त असे काम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करावे. तर गाव सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी अनेक कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात राबवण्यात आल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नसुन गावात सरपंचांचे प्रशिक्षण, योग्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी तालुका व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त विजेते हे कधीतरी महाराष्ट्र व देश पातळीवरचा पुरस्कार मिळवतील, असा विश्वास व्यक्त करतानाच शासनाची प्रत्येक योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
पशु संवर्धन व कृषी समिती सभापती सुशील चुरी, बांधकाम व वित्त समिती सभापती काशिनाथ चौधरी, समाजकल्याण समिती सभापती विष्णू कडव, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, वसई पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी व सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी. ओ. चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले.