डहाणूच्या विद्यार्थ्यांनी बनवले शैक्षणिक अ‍ॅप

ग्रामीण भागात आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी एक पाऊल!

0
3145

डहाणू, दि. 15 : शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित के. एल. पोंदा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) तयार केले आहे. सोक्रा अकॅडमी असे या अ‍ॅपचे नाव असून शैक्षणिक क्षेत्राकरिता मार्गदर्शक ठरणारे हे अ‍ॅप राज्यातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे.

सोहम राईलकर या विद्यार्थ्यांने या अ‍ॅपची निर्मिती केली असून त्यासाठी प्रसाद पाटील, प्रियांका नलावडे, आकाश मले, नैना राजकोंडा व अंकिता जठर यांचे सहकार्य लाभले आहे. या अ‍ॅपचे के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये सादरीकरण करण्यात आले. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे (कोसबाड) अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे मानद सचिव सुधीर कामत, के. एल. पोंदा हायस्कूलचे उप मुख्याध्यापक रवींद्र बागेसर व पर्यवेक्षक सिद्धार्थ मेश्राम उपस्थित होते.

या अ‍ॅपद्वारे इयत्ता पाचवी ते दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा एक मोफत पर्याय उपलब्ध होणार आहे. अनुभवी शिक्षकांनी शिकवलेल्या अत्यंत सोप्या स्वरुपातील व्हिडिओजच्या माध्यमातून, मातृभाषेतून शिकण्याची संधी लाभणार आहे. याद्वारे सर्व पाठ्य घटकांच्या नोट्सचा खजिना, नवीन अभिनव प्रयोगामध्ये उपक्रमशील शिक्षकांना सहज सहभागी होण्याची संधी, शालेय शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त इंग्रजी भाषा, प्रोग्रामिंग, किड्स सेक्शन आणि कथा कथन, इत्यादींची माहिती सुलभपणे उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन निर्मात्या युवकांनी केले आहे.