पालघर, दि. 21 : जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु करण्यात आलेल्या समर्पित (डेडिकेटेड) कोव्हिड सेंटर्समध्ये उपचार घेणार्या रुग्णांकडून अवाजवी दराने बिलं आकरली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींची दखल घेत पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष माणिक गुरुसळ यांनी संबंधित रुग्णालयांना करोना रुग्णांकडून शासकिय नियमावलीनुसारच बिलं आकरण्याची ताकीद दिली असुन अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे पालघरमधील ढवळे व फिलीया हॉस्पिटल, बोईसरमधील तुंगा, चिन्मया, वरद व अधिकारी लाईफ लाईन हॉस्पिटल (बेटेगाव), डहाणूतील फिनिक्स हॉस्पिटल व विक्रमगडमधील शारदा हॉस्पिटल अशा आठ खाजगी रुग्णालयांमध्ये समर्पित कोव्हिड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. या सेंटर्समध्ये उपचार घेणार्या कोव्हिड रुग्णांकडून शासकीय नियमावलीनुसार बिलं आकारण्याबाबत सुचना देण्यात आल्या असताना देखील ही रुग्णालये अवाजवी दराने बिले आकारत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी या आठही रुग्णालयांच्या संचालकांना एका पत्रकाद्वारे शासन नियमानुसारच रुग्णांकडून बिलांची आकारणी करावी, आकारणी करत असलेल्या बिलाबाबत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पुर्वकल्पना द्यावी तसेच आकारणी करत असलेल्या शुल्कांचा फलक आपल्या रुग्णालयात व रुग्णालयाच्या आवारात दर्शनिय भागात लावण्यात यावा, जेणेकरुन रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आपण आकारत असलेल्या फीबाबत माहिती प्राप्त होईल, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर अवाजवी बिलाबाबत प्राप्त होणार्या तक्रारींची तपासणी, तपासणी पथकाकडून करण्यात येईल व या तपासणीमध्ये आपण अवाजवी बिल आकारणी केल्याचे आढळून आल्यास आपल्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.