>> तब्बल 650 जिलेटीनच्या कांड्या व 62 बंडल डेटोनेटरचा समावेश
प्रतिनिधी/मनोर, दि. 10 : पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 8) रात्री नागझरी गावातील एका घरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला असतानाच मंगळवारी रात्री मनोर पालीसांनी याच गावातील काकड पाडा येथून आणखी स्फोटक सामग्री जप्त केली आहे. यात तब्बल 650 जिलेटीनच्या कांड्या व 62 बंडल इलेक्ट्रिक डेटोनेटरचा समावेश आहे.
सोमवारी रात्री पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने नागझरी गावातील प्रवीण अधिकारी यांच्या जुन्या घरावर छापा मारुन 327 जिलेटीनच्या कांड्या, 46 डेटोनेटर आणि 24 फ्युज असा बेकायदेशीररित्या साठवलेला स्फोटकांचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर मनोर पोलीसांनी काल मंगळवारी नागझरीतील काकड पाडा येथील रहिवासी संजय काकड यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यात 600 जिलेटीनच्या कांड्या तसेच सफेद आणि लाल रंगाच्या 62 बंडल इलेक्ट्रिक डेटोनेटरचा समावेश आहे. याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 286 सह स्फोटक पदार्थ विषयक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये करीत आहेत.
मनोर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या दगडखाणींमध्ये दगड काढण्यासाठी स्फोट घडवले जातात. यासाठी स्फोटकांचा वापर होत असला तरी सहज उपलब्ध होणार्या या स्फोटकांचा भविष्यात घातपात घडविण्यासाठी वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातमी : नागझरीत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!