डहाणू: शरद पवार यांनी केले पारेख कुटूंबीयांचे सांत्वन; पाठीशी उभे राहण्याची दिली हमी!

0
4523

डहाणू दि. 11: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांनी डहाणूचे माजी नगराध्यक्ष दिवंगत राजेश पारेख यांच्या निवासस्थानी भेट देऊन पारेख कुटूंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व विक्रमगडचे आमदार सुनील भूसारा उपस्थित होते. राजेश पारेख हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाशी निष्ठा राखलेले नेते होते. पक्ष त्यांच्या नावाचा पालघर जिल्हा अध्यक्ष पदासाठी विचार केला जात होता व दसऱ्याच्या सुमारास तशी घोषणा होणार अशी अटकळ बांधली जात होती. त्या आधीच राजेश दुर्दैवी अंत झाला. मुंबईत परतल्यानंतर देखील श्री पवार यांनी पारेख कुटूंबीयांची भेट घेतल्याचे Tweet केले आहे. या Tweet मध्ये श्री पवार यांनी राजेश यांचे पुत्र वरुण यांच्यासोबतचा फोटो Share केला आहे.

श्री शरद पवार यांच्यासोबतचे कै. राजेश पारेख यांचे तरुणपणीचे छायाचित्र

श्री शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला विशेष सन्मान दिल्याचे या निमित्ताने दिसून आले. श्री पवार दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटे आधीच राजेश यांच्या “आशिर्वाद” निवासस्थानी पोहोचले व त्यांच्या कुटूंबीयांची आस्थेने चौकशी केली. यावेळी पारेख कुटूंबीयांतर्फे इच्छा व्यक्त केल्यानंतर श्री पवार यांनी कुटूंबीयांशी खासगीमध्ये चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पारेख कुटूंबीयांना अंतर देणार नाही अशी खात्री दिली. त्यानंतर श्री पवार यांनी त्यांचे जुने कार्यकर्ते व माजी उप नगराध्यक्ष रमेशभाई कर्णावट यांच्या कुटूंबीयांची देखील भेट घेतली. दरम्यान आज कै. राजेश यांच्या शोकसभेसाठी मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली. त्यामध्ये अनेक दिग्गज व मान्यवरांचा समावेश होता.