डहाणू दि. 13: डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यावर नगरपरिषदेचा गैरकारभार व गैरप्रकार प्रकरणी कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यातील उद्भवलेला वाद सध्यातरी राजपूत यांना भारी पडताना दिसतो आहे. अतुल पिंपळे यांनी नगरविकास मंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीची चौकशी सुरु झाली असून पालघरचे जिल्हाधिकारी यांच्यासमोर 19 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पिंपळे व राजपूत यांना आपापली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.
अतुल पिंपळे यांनी भरत राजपूत यांच्या विरोधात गैरप्रकार व गैरवर्तन केल्या प्रकरणी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम 55 अ व ब नुसार कारवाई करावी असा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदर अहवालाची व नगराध्यक्षांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याबाबतची कारवाई करणेबाबत नगरविकास मंत्री यांना अर्धन्यायिक अधिकार असून त्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आता 19 ऑक्टोबर रोजी दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतील व आपला अहवाल सादर करतील. याबाबतच्या नोटीसा आज उभय पक्षकारांना बजावण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी पिंपळे हे 1 ऑगस्ट रोजी शिरीन दिनियार लर्नर्स ॲकेडमीकडे जाणारा रस्ता न करता बिले काढल्याप्रकरणी चौकशी करताना रस्ता चुकले. वेगळ्या मार्गाने गेल्यामुळे ते राजपूत यांच्या कोळंबी प्रकल्पाजवळ पोहोचले. याचा राग येऊन भरत राजपूत यांनी पिंपळेंना रस्त्यात थांबवून जाब विचारला होता व त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामत अडथळा आणल्याची पिंपळे यांची तक्रार होती. डहाणू पोलिस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये तशी नोंद करण्यात आली होती.
