डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत भाजपबरोबर टिकणार का?

दिनांक 13 ऑक्टोबर: डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे स्वागत केल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. भरत राजपूत हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. त्यातच जगदीश राजपूत यांनीच सूचक विधान करणारी पोस्ट व्हॉट्सॲपवरुन शेअर केल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर चर्चेला आणखी फोडणी मिळाली.

रविवारी (11 ऑक्टोबर) श्री शरद पवार यांनी डहाणूचे दिवंगत माजी नगराध्यक्ष राजेश पारेख यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी पवारांचे प्रथम नागरिक या नात्याने स्वागत करायची इच्छा व्यक्त केली. रस्त्यातच क्षणभर थांबून स्वागत स्वीकारण्यास पवार यांनी होकार दिला व त्याप्रमाणे 1 मिनिट 14 सेकंद वेळ देत स्वागत स्वीकारले. राजपूत व समर्थक नगरसेवक व नगरसेविकांबरोबर फोटो काढले. यावेळी राजपूत यांनी कार्यकर्त्यांची गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये स्थिरावलेले भरत राजपूत सध्या स्वपक्षावर नाराज आहेत. ते जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छूक होते मात्र पद मिळाले नाही. पदाधिकारी निवडताना त्यांना डावलले जात असल्याची त्यांची भावना आहे. डहाणू शहर अध्यक्ष पदासाठी राजपूत हे त्यांचे समर्थक भरत शहा यांची दुसऱ्यांदा वर्णी लागावी यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी वरिष्ठांना अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे पत्र दिले आहे. भाविन पारेख यांची शहराध्यक्षपदावर निवड जवळपास नक्की केली आहे. राजपूत यांनी पवारांचे स्वागत केल्यानंतर तूर्तास भाविन पारेख यांची निवड स्थगित ठेवण्यात आली आहे. राजपूत यांच्या भूमिकेचे भाजपकडून निरीक्षण केले जात आहे.

छायाचित्रात नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यासोबत भाजपचे 3 नगरसेवक व 2 नगरसेविका दिसत आहेत

भरत राजपूत यांना नगराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच भाजप सत्ता काळात राजपूत यांनी डहाणू औष्णिक वीज प्रकल्पातील राख व कोळसा हाताळणीची कामे मिळवली होती ती आता हातची जात आहेत. हे प्रश्न हाताळण्यासाठी राजपूत सत्ताधारी पक्षांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती व आता पवार यांचे स्वागत केले आहे. यातून काय घडामोडी होतात याकडे डहाणूकरांचे लक्ष लागले आहे. एखादा अपवाद वगळता भाजपचे जवळपास सर्व नगरसेवक व नगरसेविका राजपूत यांच्या प्रभावाखाली आहेत. राजपूत यांनी बंड केल्यास डहाणू शहर भाजपला मोठा फटका बसेल असे मानले जात आहे.