पालघरचे सीइओ मिलिंद बोरीकर यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी बढती

0
2488

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 18 : पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) मिलिंद बोरीकर यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी बढती देण्यात आली असुन त्यांना निरोप व बढतीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे एक छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

कुठल्याही आयएएस अधिकार्‍यासाठी त्याची मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची कारकिर्द ही सर्वात महत्वाची व प्रशासन जवळून अनुभवण्याची एक सुवर्ण संधी असते. त्यामुळे पालघरमधुन जाताना मी चांगलेच अनुभव घेऊन जात आहे, अशा भावना व्यक्त करतानाच पालघरमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल बोरीकर यांनी मुख्यमंत्री व अतिरिक्त मुख्य सचिव परदेशी यांचे आभार मानले.

4 सप्टेंबर 2017 पासून बोरीकर यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता. जवळपास 2 वर्षे त्यांनी पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेमधील अनेक महत्वपूर्ण उपक्रम व योजना यशस्वीरित्या राबविण्यात आल्या. पालघर जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याबद्दल पाणी व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते बोरिकर यांना पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.