
राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 8 : बोईसरमधील गुंदले भागात सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत 5 जुगार्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट व बोईसर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
गुंदले येथील राजेंद्र सुरेश पान्डे (वय 29) या जुगार्याच्या घरासमोरील अंगणातच हा अड्डा सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काल, गुरुवारी (दि. 7) स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट व बोईसर पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी राजेंद्र पान्डेसह राजेंद्र दत्तात्रेय हेंद्रे (वय 49), विजय काशिनाथ वणगा (वय 46), स्वप्निल बबन वणगा (वय 32), कल्पेश सुरेश तांडेल (वय 22) असे एकुण पाच जण तेथे तिन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये मुंबई पोलीस जुगार कायद्याचे कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, या जुगार्यांकडून पोलिसांनी 9 हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
