डहाणू, दि. 26 : तालुक्यातील पळे-गावठाणपाडा येथील एका वाडीत सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून 8 जुगार्यांना अटक केली आहे. गोपाळ वसंत मेहेर (वय 43, रा. मसोली-डहाणू), राजेश पंढरी दुबळा (वय 38, रा.सावटा-डहाणू), शशिकांत पालीया माच्छी (वय 35, रा. सावटा-डहाणू), अशोक कमला यादव (वय 37, रा. वाणगाव-खडखडा), यासिन इस्माईल नमाजी (वय 52, रा. केटी नगर-डहाणू), जुबेर चांदआली खान (वय 52 रा.बोईसर-खैरापाडा), हनिफ गफ्फार मेमन (वय 60 रा. पटेलपाडा, डहाणू) व सी. के. शहा (वय 62 रा. इराणीरोड-डहाणू) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पळे गावठाणपाडा येथील एका वाडीत बांधलेल्या घराच्या शेजारील मोकळ्या जागेत काही इसम नियमित जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. आरोपींना ताब्यात घेल्यानंतर रात्री एक वाजेपर्यंत ताटकळत ठेवल्यामुळे सी. के. शहा यांना मूर्च्छा आल्याचा प्रकारही घडला होता. आरोपींवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करुन आज 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास त्यांना अटक करुन सोडून देण्यात आले.
पालघरचे पोलीस उप अधिक्षक (गृह) शैलेश काळे यांच्याकडे बोईसर उपविभागाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वाणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अड्डा असल्याचे समजून हा छापा टाकला होता. मात्र त्यानंतर ही डहाणू पोलीस स्टेशनची हद्द असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाणगांव ऐवजी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. डहाणू शहरातून स्थलांतरित झालेला हा अड्डा डहाणू पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या नजरेतून सुटला होता.