मनोर, दि. 27 : पालघर तालुक्यातील मनोर पोलिस स्टेशन हद्दीतील बांगरचोळे गावातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना आठवड्याभरापूर्वी घडली आहे. या प्रकरणातील आरोपी संजय मधुकर तांबडी हा शुक्रवारी (दि. 23) गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार झाला आहे. तांबडी हा बांगरचोळे येथील जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांना त्याला अटक करण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे येत्या काही तासात सदर परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपीचा शोध घेणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली आहे.
बांगरचोळे गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि.21) सायंकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी संजय तांबडी (वय 22) याने तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी तांबडीने पीडित मुलीला दिल्याने घाबरुन पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटूंबियांपासुन लपवून ठेवली होती. अखेर पीडितेने शुक्रवारी आपल्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची घटना कुटूंबियांसमोर कथन केली. यामुळे हादरलेल्या तिच्या पालकांनी मुलीला सोबत घेत शुक्रवारी रात्री मनोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 376 सह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी हा फिर्यादी मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली असुन आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर तो फरार झाला आहे. तर आरोपी बांगरचोळे गावालगतच्या जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार शोध घेऊनही तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी पीएसआय अल्पेश विशे यांनी ‘राजतंत्र’शी बोलताना दिली.
