मनोरमध्ये शेकडो कोंबड्या आढळल्या मृतावस्थेत

0
3704
संग्रहित छायाचित्र

पालघर, दि. 19 : मनोर भागातील शिराळे गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये शेकडो कोेंबड्या मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्लूच्या भितीपोटी पोल्ट्री उद्योजकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोल्ट्री मालकाने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिल्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच या कोंबड्यांच्या मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोरपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिराळे गावात गौरांग पाटील हा तरुण पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत आहे. सोमवारी पहाटे त्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे दीडशे ते दोनशे कोसबाडी कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसुन आले. त्याने तातडीने तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी पोल्ट्री फार्मला भेट देऊन पाच कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा पशुधन विभागाकडे पाठविले आहेत. जिल्हा पशुधन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली होती की नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा पशुधन अधिकारी अजित हिरवे यांनी सांगितले.