बोईसर : दिवसाढवळ्या कारची काच फोडून 18 लाखांची चोरी

0
2926

बोईसर, दि. 19 : शहरातील मंगलम ज्वेलर्समधील कोट्यावधींची चोरीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा बोईसरमध्ये लाखो रुपयांच्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली असुन या घटनेनंतर बोईसर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत सृष्टी भागातील ठाकूर गॅलेक्सी सोसायटी परिसरात असलेल्या रजिस्ट्रेशन ऑफिससमोर काल, सोमवारी दुपारी ही घटना घडली. योगेश संखे नामक इसमाने आपली इनोव्हा कार रजिस्ट्रेशन ऑफिसजवळ उभी केली व ते ऑफिसमध्ये गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून गाडीतील 18 लाख रुपयांची रक्कम लंपास केली. जमिनीच्या व्यवहारासाठी संखे यांनी ही रक्कम आपल्याकडे बाळगली होती. दरम्यान, याबाबत तक्रार मिळाल्यानंतर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.