बोईसरमधील मंगलम ज्वेलर्समध्ये कोट्यावधींची चोरी

0
7514
  • भिंतीला भगदाड पाडून तब्बल 60 लाखांची रोकड व सुमारे 14 किलो सोनं लंपास

बोईसर, दि. 30 : शहरातील चित्रालय भागात स्थित मंगलम ज्वेलर्समध्ये आज (30 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास कोट्यावधींची चोरी झाली असुन या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विषेश म्हणजे येथील सुरक्षा रक्षकाच्या मदतीनेच 8 ते 9 चोरट्यांनी मिळून ही चोरी केल्याचे सीसीटिव्ही कॅमेर्‍यातील फुटेजमधुन पुढे आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दुकानातील 60 लाखांची रोख रक्कम व 14 किलो सोनं असा कोट्यावधींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

चित्रालयातील साई शॉपिंग कॉम्प्लेक्समधील रस्त्यालगतच्या इमारतीतच मंगलम ज्वलेर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. तळमजला व त्यावरील पहिल्या मजल्यावरील गाळ्यात हे दुकान उभारण्यात आले असुन पहिल्या मजल्यावरील गाळ्याला लागून सिस्टम फॉर सक्सेस या शैक्षणिक संस्थेचे कार्यालय आहे. चोरट्यांनी नेमका याच गोष्टीचा फायदा घेत सिस्टम फॉर सक्सेसच्या भिंतीला भगदाड पाडले व त्याद्वारे ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. यावेळी ज्वेलर्सची अतिभक्कम अशी तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आली. त्यानंतर त्यातील सुमारे 60 लाख रुपयांची रोकड व 14 किलो सोनं चोरट्यांनी लंपास केलं.

सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इमारतीतील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये सुमारे 8 ते 9 चोरटे चोरी करताना आढळून आले. विशेष म्हणजे या इमारतीत सुरक्षा रक्षकाचे काम करणारा सुरक्षारक्षक काही दिवसांपुर्वी आपल्या गावी गेला आहे. त्यामुळे काही काळासाठी त्याच्या जागी दुसर्‍या सुरक्षारक्षकाला ठेवण्यात आले आहे. या नव्या सुरक्षारक्षकाच्या मदतीनेच ही चोरी झाल्याचे सीसीटिव्हीमध्ये आढळून आले आहे. गॅस कटरसाठी वापरण्यात आलेले गॅस सिलेंडर देखील सुरक्षा रक्षकाच्या खोलीत आढळून आले आहे.

दरम्यान, चोरी करताना परिसरातील कुत्र्यांनी भूंकु नये म्हणून चोरट्यांनी शक्कल लढवत त्यांना बिस्किटे खायला घालून इमारतीबाहेर नेले. त्यानंतर रात्री 2 च्या सुमारास चोरीची सुरुवात झाली व काही तासातच कोट्यावधींचा मुद्देमाल लंपास करुन सर्व चोरटे फरार झाले.

याप्रकरणी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.