* ग्रामसभेत शक्तिप्रदर्शनासाठी कामगारांना दिली होती सुट्टी
* प्रकल्प विस्ताराचा मार्ग अवघड

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू , दि. 21 : आशागड येथील रिकाम्या औषधी कॅप्सुल्स बनविणार्या उद्योगाला पेसा कायद्यांतर्गत तरतुदींप्रमाणे आवश्यक ना हरकत पत्र देण्यास स्थानिक ग्रामसभेने प्रदूषणाचे कारण देत नकार दिल्यानंतर कंपनीचा ग्रामसभेत शक्तिप्रदर्शन घडवून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे एसीजी असोसिएटेड कॅप्सुलचा 325 कोटी रुपये खर्चाचा महत्वाकांक्षी प्रकल्प विस्तार अधांतरी राहिला आहे. आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या नसल्या तरी प्रकल्प विस्ताराचे काम मात्र सुरुच आहे. नवे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रश्नामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे.

ग्रामपंचायतीने ना हरकत पत्र नाकारल्यामुळे कंपनीच्या पुढील सर्व परवानग्या रखडल्या आहेत. परवानग्या न मिळवताच विस्ताराचे काम सुरु करण्याचा अति आत्मविश्वास व्यवस्थापनाच्या अंगलट येण्याची लक्षणे आहेत. यामुळे निर्माण झालेल्या दबावातून कंपनीने 12 जुलैला झालेल्या ग्रामसभेवर कब्जा करुन ना हरकत मिळविण्याचा प्रयत्न केला. या दिवशी कंपनीतर्फे ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी कंत्राटी कामगारांना दोन तासांची सुट्टी देण्यात आली. या कामगारांनी ग्रामसभेमध्ये हजेरी लावली. मात्र आधीच ना हरकत पत्र नाकारले गेल्यामुळे विषय पत्रिकेवर याबाबत विषयच नव्हता. हे कामगार ज्या विषयाची वाट पहात होते तो विषय न येताच सभा संपल्याचे जाहीर झाल्यानंतर मात्र गोंधळ सुरु झाला. कंपनीच्या विस्ताराला विरोध आणि समर्थन अशा घोषणा सुरु झाल्या. पोलीसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सर्वांना रवाना केले.
कंपनीकडे सांडपाणी प्रक्रिया करणारी कार्यक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याने सांडपाणी तसेच बाहेर सोडले जाते. यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. कंपनीच्या आजूबाजूच्या लोकांवर पिण्याच्या पाण्यासाठी कंपनीतर्फे दिल्या जाणार्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. याचे तिव्र पडसाद ग्रामसभेमध्ये उमटल्यानंतर, प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याने, आशागड ग्रामपंचायतीने दिनांक 27 मार्च 2019 रोजीच्या पत्रान्वये कॅप्सुल कंपनीच्या विस्तारास ना हरकत पत्र नाकारले असल्याचे कळविले. आशागड ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत ग्रामपंचायत असल्याने ग्रामसभेला अधिक अधिकार प्राप्त आहेत.
याच विषयाशी संबंधित बातमी वाचा ! ….भांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान
ना हरकत पत्र नाकारले गेल्यानंतर, कंपनीने 11 एप्रिल 2019 रोजी पत्र लिहून प्रकल्प विस्ताराच्या कामावर कारवाई करण्याचे ग्रामपंचायतीला कोणतेही अधिकार नसल्याचे उर्मट उत्तर दिले होते. त्यावर ग्रामपंचायतीने नव्याने नोटीसा बजावून 11 जून 2019 रोजी विविध शासकीय यंत्रणांकडे तक्रार केली व कंपनीने बेकायदेशीरपणे उभे केलेले बांधकाम पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. हा प्रश्न चिघळतच राहिला असून कंपनीच्या मनमानीमुळे त्यात भर पडत आहे. 9 जुलै रोजी काही ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कंपनी व्यवस्थापन व आंदोलक ग्रामस्थांची बैठक घडवून आणली. पोलिसांनी पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देखील लिहिले. मात्र या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न अधिकच जटील होत चालला आहे.
- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
(टीप – तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर बातमीच्या शेवटी दिसणार्या Whatsapp च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही ही बातमी सहज शेअर करू शकता. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा.)
आमचा ई-पेपर वाचण्यासाठी epaper.mahanews.com ला भेट द्या. खाली दिसणार्या facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन आमचे फेसबुक पेज लाईक करा!