डहाणू, दि. 17 : करोनाकाळात अविरत सेवा देऊन रुग्णांचा जीव वाचवणार्या डॉक्टरांवर मागील काही महिन्यात देशातील विविध भागात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल एसोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेने उद्या, शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पुकारले असुन देशभरातील सर्व डॉक्टर्स उद्या काळ्या फिती लावून काम करणार आहेत. डहाणू आयएमएच्या सरचिटणीस डॉ. ज्योती बापट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
कोविडमुळे होणारा मृत्यूदर कमी राखण्यामध्ये खाजगी आरोग्य यंत्रणांचा सिंहाचा वाटा आहे हे उघड सत्य आहे. डॉक्टर नेहमीच रुग्णांचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. कोरोनाच्या काळात देखील पूर्ण क्षमतेने व जिवाची परवा न करता, डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली आहे. या महामारीत कित्येक डॉक्टरांनी रुग्णसेवा करता करता आपला जीव पण गमावला आहे. अशा संकटसमयी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी आरोग्य यंत्रणेला मदत होईल असे वागले पाहिजे. मात्र दुर्दैवाने, अनेक ठिकाणी डॉक्टरांवर व रुग्णालयांवर हल्ले झाले आहेत. याच्या विरोधात सरकारने कायदे बनवले असले तरी योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. मागील दोन आठवड्यांमध्ये आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली, आदी राज्यांमध्ये रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. महाराष्ट्रात देखील गेल्या दीड वर्षात डॉक्टरांवर शारीरिक हिंसाचाराच्या 15 घटना घडलेल्या आहेत. अशा हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. यामुळे डॉक्टरांना मनमोकळेपणे रुग्णसेवा देता येत नाही. काही लोकांच्या चुकीच्या वागण्याने इतर रुग्णांचे नुकसान होते.
अशा हल्ल्यांच्या निषेधार्थ आयएमएने उद्या, 18 जून रोजी देशव्यापी निषेध दिन पाळण्याचे घोषित केल्याची माहिती डॉ. बापट यांनी दिली आहे. या दिवशी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि पंतप्रधानांनाही देशभरातून निवेदने पाठवली जाणार आहेत. डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा, सर्व वैद्यकीय आस्थापना संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात, रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे व हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालविण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.