निता ट्रॅव्हल्सच्या बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त!

0
2241
  • वाडा पोलिसांची कारवाई
  • अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू!

प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : मिठाई बनवण्यासाठी लागणार्‍या माव्याची शितगृह वाहनांतून वाहतूक करणे आवश्यक असताना निता ट्रॅव्हलच्या दोन प्रवासी बसेसमधून या माव्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे पोलिसांनी निता ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त केला असुन हा मावा भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त होतोय. या पार्श्‍वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या कारवाईमुळे माव्याचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथून वाडा, कल्याण, भिंवडी, ठाणे व उल्हासनगर आदी भागात मिठाई बनवण्यासाठी माव्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे याच मार्गाने माव्याची वाहतूक केली जाते. आज पहाटेच्या सुमारास खंडेश्वरी नाका येथे पोलिसांची गस्त सुरू असताना निता ट्रॅव्हलच्या जी.जे. 03/बी.टी. 2098 व जी.जे. 01/डी 9001 या प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या टपावर काही गोणी भरलेल्या पोलिसांना दिसल्या. यानंतर पोलिसांनी सदर गोणींबाबत चौकशी केली असता त्यात मावा असल्याचे व तो पुण्याला नेला जात असल्याचे बसचालकांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर गोणींची तपासणी केली असता एका गोणीमध्ये सुमारे 40 किलो मावा अशा एकुण 80 गोणी दोन्ही बसेसमध्ये आढळून आल्या. 3 हजार 200 किलोच्या आसपास असलेल्या या माव्याची बाजारभावानुसार पाच ते साडेपाच लाख रूपये किंमत असल्याचे समजते.

दरम्यान, जप्त करण्यात आलेला मावा भेसळयुक्त आहे किंवा कसे तसेच माव्याची वाहतूक शितगृह वाहनांतून करणे गरजेचे असताना प्रवासी वाहनांमधुन त्याची वाहतूक केल्याने पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. तर अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत पुढील तपास सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर यासंदर्भातला गुन्हा दाखल करायचा किंवा नाही हे ठरविण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.