पालघरमधुन अपहरण झालेल्या व्यवस्थापकाची हत्या!

0
2331

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पाच दिवसांपुर्वी पालघर येथून अपहरण झालेल्या अल्फा मेटल कंपनीच्या व्यवस्थापकाची अपहरणकर्त्यांनी हत्या केली आहे. आरिफ मोहम्मदअली शेख असे सदर व्यवस्थापकाचे नाव असुन याप्रकरणी पोलिसांनी 3 अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

नालासोपारा येथे राहणारे आरिफ मोहम्मदअली शेख पालघर येथील अल्फा मेटल नामक कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होते. 9 मे रोजी दुपारच्या सुमारास आरिफ शेख हे टेंभोडे काशीपाडा सातपाटी रोडवरून रिक्षाने प्रवास करत असताना पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांचे अपहरण केले होते. यावेळी शेख यांच्याच कारखान्यात काम करणार्‍या काही कामगारांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी पालघर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला असता अपहरणासाठी वापरण्यात आलेली सफेद स्कॉर्पिओ गाडी बोईसर येथे आढळून आली होती. पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेतल्यानंतर तपासाची चक्रे फिरली व काही तासांतच प्रशांत देवराम संखे व चिंनु उर्फ समदेव संतोष संखे यांना वापी गुजरात येथून तर प्रशांत गोरख महाजन या अपहरणकर्त्याला अमळनेर (जि. जळगाव) येथून अटक करण्यात आली.

अटक आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता पैशांच्या वादातून मोहम्मद शेख यांचे अपहरण केल्याचे तसेच गाडीतच त्यांना जीवे ठार मारुन मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावल्याची कबुली त्यांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली असुन गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.