रसायन प्रक्रियेदरम्यान वायुगळती; तारापूर एमआयडीसीतील तीन कामगारांचा मृत्यू

0
2396

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : चार दिवसांपूर्वीच विषारी वायू गळती होऊन 30 कामगारांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा तारापूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या कामगारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

एस्क्वायर केमिकल (प्लॉट क्र. एन 60) असे सदर कंपनीचे नाव असुन येथे हेअर डायशी संबंधित पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, आज नेहमीप्रमाणे कंपनीतील तीन कामगार आर. एम. 2 नामक रसायन प्रकिया करत असताना अचानक बाहेर पडलेल्या रसायनावर यातील एका कामगाराने पाणी टाकले. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन निर्माण झालेल्या विषारी वायूने तिन्ही कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कंपनीचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे (वय 59), ऑपरेटर दत्तात्रेय घुले (वय 25) व रघुनाथ गोरई (वय 50) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या घटनेनंतर तिघांचा मृतदेह तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात आणल्यानंतर सदर रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. तर कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या वायूची तीव्रता इतकी भयानक होता की या कंपनीच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात त्याची दुर्गंधी जाणवत होती. तर या घटनेनंतर कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या पाच ते सहा कंपन्यांना पोलिसांनी आपले कामकाज बंद करण्यास सांगितले होते.

दरम्यान, तारापूर एमआयडीसीत वायुगळती झाल्याची एकाच महिन्यातील ही पाचवी घटना आहे. त्यामुळे येथे काम करणार्‍या कामगारांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.