प्रतिनिधी
वाडा, दि. 02 : तालुक्यातील नांदनी ग्रामपंचायतीच्या मनमानी, हुकूमशाही व भ्रष्ट्र कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सुरेश राव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन मोर्चा काढून पंचायत समितीला घेराव घातला.
सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक व जात निहाय सर्वेला प्राधान्यक्रम ठरवून घरकुल लाभार्थ्यांची निवड करावी, झोपडीत राहणार्या तसेच विधवा महिलांना प्रधानमंत्री योजनेत प्रथम प्राधान्य द्यावे, वाटप यादीनुसार लोकांचे पैसे शौचालय लाभार्थ्यांना परत करावे, ज्या पाड्यांत पाणी टंचाई आहे, त्यांना पाण्याची सोय करून द्यावी, पेसा योजने अंतर्गत निधी कुठे व कसा वापर केला त्याची माहिती ग्रामसभेत व नागरीकांना द्यावी व कामात कसूर करणार्या कर्मचारी व अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशा विविध मागण्या घेऊन आंदोलक महिला सोमवारी वाडा पंचायत समितीवर येऊन धडकल्या. या दरम्यान शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, शेलार, संजय भोईर, सुरेश पवार व ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांची भेट घेऊन चर्चा केली असता महिलांच्या काही मागण्या मान्य करून दोषी अधिकार्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.