
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 21 : तालुक्यातील आशागड येथे सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका जुगार्याला अटक केली आहे. तर इतर तिघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. मोहम्मद शरीफ शेख (वय 59) असे अटक आरोपीचे नाव असुन संजय पांडे व इतर दोघे फरार आहेत.
आशागडमधील जामशेतनाका येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या एका शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी 19 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता चार इसम येथे तिन पत्ती नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी चौघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला असता संजय पांडे व 2 अज्ञात इसम (नाव समजू शकलेले नाही) अंधाराचा फायदा घेत पसार झाले. तर मोहम्मद शरीफ शेख या जुगार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या अड्ड्यावरुन 7 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी चारही जुगार्यांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन फरार जुगार्यांचा शोध घेण्यात येत आहे.
