> पालघर येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न
mahanews Media/पालघर, दि. 16 : काळाप्रमाणे पत्रकारितेचे स्वरूपही बदलत असून सध्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजीटल पत्रकारितेलाही महत्त्व आले आहे. यातील समाजमाध्यमे प्रत्येकाच्या हातात उपलब्ध झाल्याने प्रत्येकानेच सामाजिक भान जपणे आवश्यक असल्याचा सूर येथे आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय प्रेस परिषदेच्या सूचनेनुसार डिजीटल युगातील पत्रकारिता : आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात स्थानिक पत्रकारांनी सहभाग घेऊन उत्स्फुर्तपणे आपली मते मांडली.
लोकशाही व्यवस्थेमध्ये समाज प्रबोधनाच्या दृष्टीने पत्रकारितेला महत्त्वाचे स्थान आहे. प्रिंट आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून पत्रकार आपली भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेतच. यामध्ये आता डिजीटल युगातील पत्रकारितेची भर पडली असून नवीन पिढी याकडे अधिक आकृष्ट होत आहे. जवळपास सर्वांच्याच हातात मोबाईल फोन असल्याने समाज माध्यमे यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहेत. साहजिकच प्रत्येक नागरीक आपली भूमिका सहजपणे व्यक्त करीत असल्याने सर्वांनीच सामाजिक भान जपणे आवश्यक असल्याची भावना उपस्थित सर्वच पत्रकारांनी व्यक्त केली. एखादी चुकीची बातमी समाज माध्यमांमधून पसरत असेल तर त्याला वेळीच रोखणे ही देखील प्रत्येक नागरीकाची जबाबदारी बनली असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले. पत्रकारिता करतानाच विधायक कार्यांच्या माध्यमातून पत्रकार समाजासमोर आदर्श निर्माण करू शकतात अशी भावना देखील चर्चेत मांडण्यात आली.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे स्वागत करून राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या चर्चासत्रात दै. पुढारीचे मंगेश तावडे, दै. महासागरचे राजेंद्र कृष्णा पाटील, इंडिया न्यूजचे विनायक पवार, दै. नवभारतचे संजय सिंह ठाकूर, दै. लोकसत्ताचे निखील मेस्त्री, ईटीव्ही भारतचे नमित पाटील, दै. सामनाच्या श्रीमती वैदेही वाढाण, आकाशवाणी मुंबईच्या नीता चौरे, जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा निरभवणे यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!